[परमपूज्य पोप फ्रान्सिस व्हॅटिकन सिटीतील चित्रीकरण प्रथम प्रक्षेपण ऑक्टोबर २०२० TED Countdown Global Launch] हॅलो! आज आपण कठीण आव्हानांच्या एका ऐतिहासिक कालखंडातून जात आहोत. कोविड -१९ च्या महामारीच्या संकटामुळे जग हादरून गेले आहे. यामुळे आणखी एक वैश्विक आव्हान जास्त ठळक झाले आहे: सामाजिक-पर्यावरणविषयक समस्या. यासाठी आपण सर्वांनी निवड करण्याची गरज आहे. कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, आणि कोणती नाही, यातली निवड. आपण अत्यंत गरीब जनतेच्या हालांकडे दुर्लक्ष करत राहणार, आपल्या सर्वांच्या निवासस्थानाशी वाईट वर्तणूक करणार, म्हणजे पृथ्वीशी, की प्रत्येक पातळीवर सामील होऊन आपल्या कृतीमध्ये बदल घडवून आणणार. विज्ञान आपल्याला दिवसागणिक वाढत्या अचूकतेने सांगते आहे, की तात्काळ कृती करण्याची गरज आहे. ही अतिशयोक्ति नसून विज्ञान हेच सांगते आहे. मूलगामी, महाभयंकर हवामान बदल टाळण्याची आशा आपल्याला जिवंत ठेवायची असेल, तर त्यासाठी तातडीने कृती केली पाहिजे. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. आपली सद्सदविवेकबुद्धी आपल्याला सांगते, की आपण गरिबांच्या हालाकडे, वाढत्या आर्थिक विषमतेकडे आणि सामाजिक अन्यायाकडे तटस्थपणे पाहू शकत नाही. तसेच, अर्थव्यवस्था ही उत्पादन आणि वितरण यांच्यामध्ये स्वतःला सीमित ठेवू शकत नाही. पर्यावरण आणि मानवाचा आत्मसन्मान यावर होणारे तिचे परिणाम तिने लक्षात घ्यायला हवेत. आपण असे म्हणू शकतो, की अर्थव्यवस्था, तिचे स्वरूप, पद्धत आणि तिचे कार्य सर्जनशील असायला हवे. सर्जनशीलता. मी तुम्हांला एका प्रवासात सामील होण्याचे आवाहन करतो. बदल आणि कृतीचा प्रवास. यात फारसे शब्द नाहीत, तर ठोस आणि तातडीची कृती आहे. याला मी प्रवास म्हणतो, कारण यात दिशाबदलाची, परिवर्तनाची गरज आहे. आपण कोणीच या संकटातून न बदलता बाहेर येता कामा नये. आपण तसे बाहेर पडू शकत नाही. एखाद्या संकटातून कधीच न बदलता बाहेर येता येत नाही. त्यातून बाहेर पडायला वेळ लागेल, कष्ट करावे लागतील. आपल्याला हळूहळू एक एक पाऊल उचलावे लागेल. दुर्बलांना मदत करावी लागेल, साशंक असलेली मने वळवावी लागतील. कल्पकतेने नवीन उत्तरे शोधावी लागतील; आणि जबाबदारीने ती अंमलात आणावी लागतील. आपले ध्येय स्पष्ट आहे: पुढच्या दशकात असे जग उभारणे, की जिथे आजच्या पिढीतल्या सर्व मानवांच्या गरजा भागतील, आणि पुढच्या पिढयांच्या संधी कमी होणार नाहीत. मी सर्व धर्माच्या लोकांना आवाहन करीत आहे. मग ते ख्रिस्ती असोत किंवा नसोत, सद्भावना बाळगणाऱ्या सर्व लोकांनी या प्रवासाला सुरुवात करावी. आपल्या धर्माचा विश्वास बाळगून सुरुवात करा. किंवा तुम्ही धर्म मानत नसाल, तर मनातल्या इच्छेच्या, सद्भावनेच्या बळावर सुरुवात करा. आपल्यापैकी प्रत्येकजण, एकेकटे किंवा एखाद्या समूहाचा भाग म्हणून -- कुटुंब, धार्मिक समाज, व्यवसाय, संघटना, संस्था वगैरे -- भरीव हातभार लावू शकतो. पाच वर्षांपूर्वी मी Laudato Si’ हे पत्र लिहिले. आपल्या पृथ्वीचे रक्षण या हेतूला ते समर्पित होते. त्यात अखंड पर्यावरणाची कल्पना मांडली आहे. पृथ्वीच्या हाकेला तसेच गरिबांच्या आक्रोशाला प्रतिसाद देण्यासाठी. अखंड पर्यावरण हे संपूर्ण चित्र पाहण्याचे आवाहन आहे. यामागे धारणा आहे, की जगातले सर्वकाही एकमेकांशी जोडलेले आहे, आणि या महामारीने आठवण करून दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर अवलंबून आहोत, तसेच या धरणीमातेचे चाकर आहोत. हे चित्र पाहताना गरज निर्माण होते ती प्रगतीची निराळी व्याख्या, निराळे मापदंड शोधण्याची. अर्थशास्त्र, तंत्रज्ञान, वित्तशास्त्र, उत्पादकता यांच्या मापदंडांमध्ये सीमित न राहता नैतिक-सामाजिक आणि शैक्षणिक मापदंडांना प्रामुख्याने वाव देण्याची. आज मी तीन प्रकारच्या कृतीचा प्रस्ताव मांडतो. Laudato Si' मध्ये मी लिहिल्याप्रमाणे अखंड पर्यावरणाकडे नेणाऱ्या प्रवासाकरिता बदल आणि योग्य दिशा मिळण्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाची पायरी आवश्यक आहे. पहिला प्रस्ताव असा: आपल्या सामायिक निवासस्थानाच्या काळजीसाठी प्रत्येक पातळीवर ज्ञानाचा प्रसार करणे. पर्यावरणविषयक समस्या मानवी गरजांशी संबंधित असतात हा समज दृढ करणे. आपल्याला हे मुळातून समजून घ्यावे लागेल. पर्यावरणविषयक समस्या मानवी गरजांशी संबंधित असतात. हे शिक्षण विज्ञानावर आणि नैतिकतेवर आधारलेले आहे. या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला आनंद वाटतो, की अनेक तरुणांना पर्यावरणाबद्दल आणि समाजाबद्दल एक नवी जाण आहे, आणि त्यापैकी काहीजण पर्यावरणाच्या आणि न्यायाच्या रक्षणार्थ निस्वार्थीपणे लढा देत आहेत. दुसरा प्रस्ताव: पाणी आणि अन्न यांना जास्त महत्त्व दिले पाहिजे. पिण्यासाठी निर्मळ पाणी उपलब्ध असणे हा एक अत्यावश्यक आणि जागतिक मानवी हक्क आहे. तो अत्यावश्यक आहे, कारण त्यावर लोकांचे जीवन अवलंबून आहे. त्यामुळे ही अट इतर कोणताही हक्क किंवा जबाबदारी बजावण्याआधी पाळली पाहिजे. शेतीच्या अविध्वंसक पद्धतींद्वारे सर्वांना पुरेसे अन्न मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे. मग हा संपूर्ण उत्पादन आणि अन्न वितरण चक्राचा मूलभूत हेतू झाला पाहिजे. तिसरा प्रस्ताव ऊर्जा संक्रमणाबाबत आहे. टप्प्याटप्प्याने पण विनाविलंब रीतीने जीवाश्म इंधनाच्या जागी स्वच्छ ऊर्जेचा वापर करणे. आपल्या हातात थोडीच वर्षे उरली आहेत. शास्त्रज्ञांनी केलेल्या हिशोबानुसार साधारणपणे तीसपेक्षा कमी वर्षे. आपल्याकडे थोडीच वर्षे आहेत, तिसापेक्षाही कमी. वायू उत्सर्जन आणि वातावरणातला हरितगृह वायू परिणाम बराचसा कमी करण्यासाठी. हा बदल जलद झाला पाहिजे. त्याने आजची आणि भविष्यातली ऊर्जेची गरज भागविली पाहिजे. इतकेच नव्हे, तर गरीब, स्थानिक जनता आणि ऊर्जा उत्पादन क्षेत्रातल्या कामगारांवरच्या परिणामांबद्दल काळजी बाळगली पाहिजे. या बदलाला प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या सामायिक निवासस्थानाच्या सर्वंकष रक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या तातडीच्या गरजेकडे व्यापाराची दिशा वळवणे. म्हणजे आपल्या गुंतवणुकीमधून, अखंड पर्यावरणाचे मापदंड न पाळणाऱ्या कंपन्या वगळणे. आणि या संक्रमण काळात शाश्वतता, सामाजिक न्याय आणि सर्वांचे हित हे मापदंड व्यापाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी ठोस कार्य करणाऱ्या कंपन्यांना उत्तेजन देणे. अनेक संस्थांनी, कॅथलिक आणि इतर धर्मांनी या दिशेने काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वास्तविक आपण पृथ्वीकरिता काम केले पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. जोपासना, रक्षण केले पाहिजे. एखाद्या संत्र्याप्रमाणे तिला पिळत राहता कामा नये. असे म्हणता येईल, की पृथ्वीला पुनरुज्जीवन देणे हा एक मानवी हक्क आहे. समस्यांवर शाश्वत उपाय शोधण्यासाठी अनिवार्य अशा सर्वंकष कृतींच्या एका मोठया संचाचा भाग म्हणून हे तीन प्रस्ताव समजून घेतले पाहिजेत. आपली आजची अर्थव्यवस्था अशाश्वत आहे. अनेक गोष्टींचा फेरविचार करावा लागेल. हा नैतिकदृष्टया अत्यावश्यक आणि तातडीचा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. आपण उत्पादन कसे करतो, वापर कसा करतो. अपव्यय करणारी आपली संस्कृती. आपली अल्प मुदतीची दृष्टी, गरिबांचे शोषण, त्यांच्याकडे पाहण्याची अलिप्तता, वाढत जाणारी विषमता, आणि घातक ऊर्जा स्त्रोतांचे व्यसन. ही सर्व आव्हाने आहेत. पण याबद्दल आपल्याला विचार केला पाहिजे. अखंड पर्यावरण हे आपल्या निसर्गाबरोबरच्या नातेसंबंधाविषयी एक नवीन कल्पना मांडते. यातून एका नव्या अर्थव्यवस्थेचा मार्ग दिसेल, जिथे संपत्ती निर्माण करण्याचा उद्देश निगडित असेल, मानवाच्या सर्वंकष हिताशी आणि आपल्या सामायिक निवासस्थानाच्या प्रगतीशी. विनाशाशी नव्हे. याचा दुसरा अर्थ आहे धोरणाचे नूतनीकरण. सर्वश्रेष्ठ प्रकारच्या उदारतेमधून हे निर्माण होईल. होय, प्रेम हे व्यक्तींमध्ये असते तसेच ते राजकीयदेखील असते. त्यात सर्व समाज आणि निसर्ग समाविष्ट आहे. म्हणून मी तुम्हांला सर्वांना आवाहन करतो, या प्रवासात सामील व्हा. हे आवाहन मी Laudato Si ' मध्ये आणि All Brothers या नव्या पत्रातही केले आहे. Countdown या शब्दात सुचवल्याप्रमाणे आपल्याला तातडीने कृती केली पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकजण मोलाची भूमिका बजावू शकतो. आपण सर्वानी आज, उद्या नव्हे, आजच सुरुवात करायला हवी. कारण भविष्यकाळ आजच उभारला जातो आहे. आणि तो एकट्याने नव्हे, तर समाजातून आणि एकात्मतेतून उभा राहतो. धन्यवाद.