तर मी इथून सुरुवात करेन: दोन वर्षांपूर्वी एका आयोजकाचा मला फोन आला कारण मी त्यांच्यासाठी एक भाषण करणार होते तर फोनवर ती म्हणाली, "मला कळत नाहीये मी जाहिरातीत मी तुमच्याविषयी काय लिहू!" मी विचार केला, " बरं, नक्की काय अडचण आहे?" तेव्हा ती म्हणली, "हे बघा, मी तुम्हाला ऐकलंय, आणि मला वाटतं, मी तुम्हाला संशोधक म्हणू शकते, पण मला भीती वाटते की, तुम्हाला संशोधक म्हटलं तर कोणी येणार नाही, कारण त्यांना वाटेल की तुम्ही निरस आणि निरुपयोगी बोलाल." (हशा) मी म्हटलं, "ठीक आहे." मग ती म्हणाली, " मला तुमच्या भाषणातली आवडलेली गोष्ट अशी की तुम्ही एक गोष्ट सांगणाऱ्या आहात. म्हणून मला वाटतं मी तुम्हाला एक गोष्टी सांगणारी म्हणेन." आणि अर्थात, माझ्यातला असुरक्षित, बुद्धिवादी जागा झाला, मी म्हटलं, " तू काय म्हणणार आहेस मला?" आणि ती म्हणाली, " मी तुम्हाला गोष्ट सांगणारी बाई म्हणणार." मग मी म्हटलं, बाई गं, त्यापेक्षा सोनपरी कसं वाटेल?" (हशा) मी म्हटलं, "मला जरा यावर विचार करू दे." मी धीराने घ्यायचा प्रयत्न केला. आणि विचार केला, खरंतर, मी एक गोष्ट सांगणारीच आहे. मी गुणात्मक संशोधन करते. गोष्टी गोळा करते; तेच माझं काम आहे. आणि कदाचित गोष्ट म्हणजे आत्मा असलेली माहिती. आणि कदाचित मी एक गोष्ट सांगणारीच असेन. आणि म्हणून मी म्हटले, "असं करुया का? तू असं सांग की मी एक गोष्टी सांगणारी संशोधक आहे." त्यावर ती हसू लागली अन् म्हणली, " असं काही नसतंच." (हशा) तर, मी एक गोष्टी सांगणारी संशोधक आहे, आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे -- आपण बोलतोय जाणीवा विस्तारण्याविषयी -- आणि म्हणून मला बोलायचंय आणि काही गोष्टी सांगायच्या आहेत माझ्या एका संशोधन प्रकल्पातल्या ज्यानी माझ्या जाणीवा मुळापासून विस्तारल्या आणि माझ्या जगण्याच्या, प्रेमाच्या, कामाच्या आणि पालकत्वाच्या सवयी खरोखर बदलून टाकल्या. आणि माझी गोष्ट इथे सुरु होते. मी जेव्हा एक तरुण, पीएचडी करणारी, विद्यार्थी संशोधक होते, माझ्या पहिल्या वर्षी मला एक प्राध्यापक होते ज्यांनी आम्हाला सांगितलं, "हे बघा, जर तुम्ही एखादी गोष्ट मोजू शकत नसाल, तर ती गोष्ट अस्तित्वात नसते." मला वाटलं की ते माझी चेष्टा करत आहेत. मी म्हटलं, खरंच?" आणि ते म्हणाले, अगदी १००%" आणि तुमच्या माहितीसाठी मी समाजशास्त्राची पदवीधर आहे आणि त्यातच पदव्युत्तर शिक्षण घेतलंय, आणि मी समाजशास्त्रात पीएचडी करत होते, त्यामुळे माझ्या संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत माझ्या आजूबाजूला अशी लोकं होती ज्यांचा विश्वास होता की, "जगणे गुंतागुंतीचे आहे, त्यावर प्रेम करा." आणि माझ्यामते, जगणे गुंतागुंतीचे असेल तर तो गुंता सोडवा, त्याचं वर्गीकरण करा आणि त्याला खाऊच्या डब्ब्यात ठेवून द्या." (हशा) आणि विचार केला तर वाटतं (तेव्हा) मला माझा मार्ग सापडला, एका अशा करीयरचा पाया रचला गेला ज्यात मी ओढली गेले खरोखर, समाजशास्त्रातल्या एका मोठ्या विधानानुसार (जे) आहे, "कामाच्या अवघडलेपणात स्वतःला झोकून द्या." आणि मी अशी आहे की, अवघड गोष्टीला भिडा जमिनीवर लोळवा आणि १००% मार्क मिळवा. हा माझा मंत्र होता. त्यामुळे मी अतिशय आतुर होते. आणि मी विचार केला की नक्कीच हे माझं करियर असेल, कारण मला गुंतागुंतीच्या विषयांमध्ये रस आहे. पण मला त्यांना सोपे (कमी किचकट) बनवायची इच्छा आहे. मला ते (विषय) समजून घ्यायचे आहेत. मला ह्या गोष्टींच्या अंतरंगात शिरायचे आहे ज्या मला माहित्येय की महत्वाच्या आहेत आणि मला त्या सर्वांसाठी उलगडून दाखवायच्या आहेत. तर मी सुरुवात केली नातेसंबंधांपासून. कारण दहा वर्षं समाजकार्यात घालवल्यावर तुमच्या लक्षात येतं की केवळ संबंधांमुळेच आपण इथे आहोत. त्यामुळेच आपल्या आयुष्याला हेतू आणि अर्थ प्राप्त होतो. सारे काही याबद्दलच आहे. याने काही फरक पडत नाही की तुम्ही अशा लोकांशी बोलताय जे सामाजिक न्यायासाठी काम करतात किंवा मानसिक स्वास्थ्य आणि छळ आणि दुर्लक्ष (यांत), आपल्याला कळत की नातेसंबंध, संबंध जोडण्याची क्षमता ही -- जी आपल्या जैविक संरचनेतच आहे -- त्यामुळेच आपण इथे आहोत. तेव्हा मी विचार केला की, चला, मी नाते संबंधांपासूनच सुरुवात करावी. तर, म्हणजे बघा जेव्हा तुमच्या बॉसकडून तुमचं मूल्यमापन होतं, आणि बॉस तुमच्याबद्दल ३७ चांगल्या गोष्टी सांगतो, आणि एक गोष्ट -- "ज्यात सुधारणेला वाव असतो?" (हशा) आणि तुम्ही त्या एकाच गोष्टीचा विचार करीत राहता, खरं ना? तर, माझ्या कामाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं, कारण जेव्हा तुम्ही लोकांना प्रेमाविषयी विचारता, ते तुम्हाला प्रेमभंगाबद्दल सांगतात. जेव्हा तुम्ही लोकांना आपलेपणाबद्दल विचारता, ते तुम्हाला त्यांचे सर्वात वेदनामय असे वगळले जाण्याचे अनुभव सांगतात. आणि जेव्हा तुम्ही लोकांना संबंधांविषयी विचारता, लोकांनी मला तुटलेपणाच्या गोष्टी सांगितल्या. तर लवकरच -- खरंतर ६ आठवडे संशोधनात घालवल्यावर -- माझ्यासमोर एक अनामिक गोष्ट आली जिने नातेसंबंधांना अशाप्रकारे उलगडले जे मला समजत नव्हते किंवा (जे मी ) पाहिलेही नव्हते. आणि मग मी माझे काम थांबवले आणि विचार केला, मला ह्या गोष्टीचा छडा लावायला हवा. आणि ती गोष्ट निघाली शरम. आणि शरमेचा सोपा अर्थ होतो संबंध तुटण्याचे भय: माझ्याविषयी असे काहीतरी आहे का जे जर इतरांना कळले वा दिसले तर मी संबंध ठेवण्यालायक राहणार नाही? मी शरमेबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगू शकते: ती वैश्विक आहे; आपल्या सर्वांमध्ये असते. केवळ तीच लोकं बेशरम असतात ज्यांची माणुसकी वा नातेसंबंध ठेवण्याची क्षमता नसते. कोणी तिच्याबद्दल बोलू इच्छित नाही, आणि जितके कमी बोलाल तितकी ती जास्त वाटत असते. ह्या शरमेच्या मूळाशी काय असतं तर, "मी (यासाठी) लायक नाही," -- ही जाणीव आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे: " मी तितकासा स्पष्टवक्ता नाही, बारीक नाही, श्रीमंत नाही, सुंदर नाही, हुशार नाही, वरचढ नाही." आणि ह्या साऱ्याच्या मूळाशी होती ती अत्यंत वेदनादायी अगतिकता, ही कल्पना की, जर संबंध जोडायचे असतील तर आपल्याला लोकांसमोर आपले स्वरूप उघडे करावे लागेल, खरेखुरे समोर यावे लागेल. आणि तुम्हाला कळलंच असेल मला अगतिकतेबद्दल काय वाटतं ते. मी तिरस्कार करते अगतिकतेचा आणि मग मी विचार केलं, ही माझ्यासाठी एक संधी आहे अगतिकतेला माझ्या फूटपट्टीने हरवण्याची. मी यात शिरणार, याचा छडा लावणार, एक वर्ष घालवणार आणि मी शरम (ही गोष्ट) पूर्णपणे उलगडून दाखवणार, अगतिकता कशी काम करते हे समजून घेऊन, मी तिच्यावर मात करणार आहे. तर मी तय्यार होते आणि खूप उत्साहात देखील. तुम्हाला कळलंच असेल की पुढे काहीतरी अनपेक्षित (वाईट) होणारे. (हशा) तुम्हाला माहित्येय. तर मी शरमेबद्दल खूप काही सांगू शकेन, पण मला इतरांचा वेळ मागावा लागेल. पण त्या साऱ्याचे सार जे मी तुम्हाला सांगू शकते ते असे की -- आणि ही कदाचित माझ्या दहा वर्षांच्या संशोधनातून मी शिकलेली सर्वांत महत्वाची गोष्ट आहे. माझ्या एका वर्षाची सहा वर्षे झाली: हजारो गोष्टी, शेकडो दीर्घ मुलाखती, विशेष लक्ष गट. एका क्षणी, लोकं मला त्यांच्या रोजनिशीची पाने पाठवत होते आणि त्यांच्या कहाण्या पाठवत होते -- ६ वर्षांत (जमा झालेली) हजारो तुकड्यांमधली माहिती. आणि मला त्यावर (विषयावर) पकड आल्यासारखे वाटू लागले. मला बऱ्यापैकी कल्पना आली की, शरम महणजे काय, आणि तिचे कार्य कसे चालते. मी एक पुस्तक लिहिले, एक सिद्धांत प्रसिद्ध केला, पण काहीतरी चुकत होते -- आणि ते असे होते की, जर मी सर्व मुलाखत घेतलेले लोकं घेतले आणि त्यांची विभागणी केली एक ते लोकं ज्यांना स्वतःच्या लायकीबद्दल खात्री होती -- म्हणजे साऱ्याचं सार शेवटी हेच असतं ना, स्वत्वाची जाणीव -- ज्यांना प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती -- आणि जे लोकं ती मिळवण्यासाठी धडपडत होते, आणि ते ज्यांना आपल्या लायकीविषयी शंका होती. त्यांच्यात केवळ एकच फरक होता जो त्यांना अशा लोकांपासून वेगळ करत होता ज्यांना प्रेम आणि आपलेपणाची खोलवर जाण होती आणि जे लोकं ती मिळवण्यासाठी धडपडतात. आणि तो असा की, ज्या लोकांना प्रेमाची आणि आपलेपणाची प्रखर जाणीव होती त्यांचा विश्वास होता की आपण त्यासाठी लायक आहोत. इतकंच. त्यांना खात्री होती की ते लायक आहेत. आणि माझ्यामते, एक कठीण गोष्ट जी आपल्याला संबंध जोडण्यापासून परावृत्त करते ती म्हणजे आपण त्यास पात्र नसल्याची भीती, ती एक गोष्ट होती, जी मला वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अधिक खोलवर जाणून घ्यायची गरज भासत होती. म्हणून मग मी असं केलं की मी अश्या सगळ्या मुलाखती घेतल्या जिथे मला स्वत्वाची जाणीव दिसली, जे लोकं त्या जाणीवेने जगत होते, आणि त्या लोकांकडे पाहू लागले. या लोकांमध्ये काय समान होतं? मला जरा स्टेशनरी साहित्याचं व्यसन आहे, पण तो वेगळ्या भाषणाचा विषय होईल. तर माझ्या हातात एक फाईल फोल्डर होता आणि एक मार्कर पेन, आणि मी म्हटलं, या संशोधनाला काय म्हणू मी? आणि सर्वांत प्रथम माझ्या मनात जो शब्द आला तो होता सहृदयी. ही सहृदयी लोकं स्वत्वाच्या सखोल जाणीवेनं जगत असतात. तेव्हा मी त्या फाईलवर (नाव) लिहिलं, आणि माहितीकडे बघायला सुरुवात केली. प्रत्यक्षात मी सुरुवातीचे चार दिवस सर्व माहिती पिंजून काढली, माहितीचा माग घेतला, सर्व मुलाखती बाहेर काढल्या, कहाण्या वाचल्या, अनुभव वाचले. काय संकल्पना आहे? काय सूत्र/पॅटर्न आहे? माझा नवरा मुलांना घेऊन बाहेरगावी गेला कारण मी अशावेळी नेहमीच एका बेभान अवस्थेत जाते, जेव्हा मी फक्त लिहिते आणि संशोधन करत असते. तर मला सापडलं ते असं. त्यांच्यात समान गोष्ट होती ती म्हणजे धैर्याची जाण. आणि इथे तुमच्यासाठी मला धैर्य आणि शौर्य यातील फरक स्पष्ट केला पाहिजे . धैर्य (करेज), याची मूळ व्याख्या, जेव्हा हा शब्द पहिल्यांदा इंग्रजी भाषेत आला -- तो लॅटिन भाषेतल्या 'कर' शब्दावरून ज्याचा अर्थ होतो हृद्य -- आणि मूळ व्याख्या अशी होती की तुम्ही कोण आहात हे तुमच्या संपूर्ण हृदयापासून सांगणे. आणि ह्या साऱ्या लोकांकडे साध्या शब्दांत, अपरिपूर्ण असण्याचे धैर्य होते. त्यांच्याकडे दयाबुद्धी होती आधी स्वतःशी दयाबुद्धीने वागण्याची आणि मग इतरांशी, कारण, असं आहे की, आपण दुसऱ्यांशी सहानुभूतीने वागू शकत नाही जर आपण स्वतःशी दयाबुद्धीने वागलो नाही तर. आणि शेवटची गोष्ट म्हणजे ते जोडलेले होते, आणि -- हे कठीण आहे -- खरं वागल्यामुळे, त्यांची स्वतःला अपेक्षित स्वप्रतिमा सोडायची तयारी होती (कशासाठी तर) त्यांच्या खऱ्या स्वरुपात पुढे येण्यासाठी, आणि जे नातेसंबंध जोडण्यासाठी तुम्हाला करावंच लागतं. दुसरी गोष्ट जी त्यांच्यात समान होती ती म्हणजे: त्यांनी अगतिकतेचा पूर्णपणे स्वीकार केला होतं. त्यांचा विश्वास होता की ज्या गोष्टी त्यांना अगतिक बनवत होत्या त्या त्यांना सुंदरही बनवत होत्या. त्यांच्या बोलण्यातून अगतिकता ही सुखदायी, किंवा अतिशय वेदनामय असल्याचे येत नव्हते-- जसं मी आधी शरमेच्या मुलाखतींमध्ये ऐकलं होतं. त्यांच्यामते अगतिकता गरजेची होती. त्यांच्या बोलण्यातून (जाणवत होती) ती तयारी पहिल्यांदा प्रेमाची कबुली देण्याची, तयारी अशा गोष्टी करण्याची जिथे कोणतीही खात्री नसते, तयारी तुमच्या मॅमोग्राफीनंतर डॉक्टरांच्या बोलावण्याची वाट पाहण्याची. त्यांची अशा नात्यामध्ये गुंतवणूक करायची तयारी होती जे यशस्वी होईल किंवा होणार नाही. त्यांच्यामते ही गोष्ट मुलभूत होती. मला स्वतःला ही दगाबाजी वाटत होती. माझा विश्वास बसत नव्हता (कारण) मी संशोधनाशी एकनिष्ठतेची शपथ घेतली होती, जिथे आमचं काम -- तुम्हाला माहित्येय की संशोधनाची व्याख्या आहे की नियंत्रण करणे आणि अंदाज बांधणे, तत्वांचा अभ्यास केवळ एका कारणासाठी नियंत्रण आणि अंदाज बांधण्यासाठी. आणि आता माझ्या या नियंत्रित आणि अचूक अंदाज बांधण्याच्या मोहिमेतून असे उत्तर मिळाले की अगतिकतेने जगणे हाच खरा मार्ग आणि नियंत्रित करणे आणि अंदाज बांधणे थांबवा. याने मला थोडे नैराश्य आले -- (हशा) -- जे प्रत्यक्षात हे असे (प्रचंड) दिसत होते. (हशा) आणि होते सुद्धा. मी त्याला नैराश्य म्हणते; माझी समुपदेशक त्याला आध्यात्मिक जागृती म्हणते. आध्यात्मिक जागृती ऐकायला नैराश्यापेक्षा बरं वाटतं, पण तुम्हाला सांगते ते नैराश्यच होतं. आणि मला माझे संशोधन बाजूला ठेवावे लागले आणि समुपदेशक शोधावा लागला. तुम्हाला म्हणून सांगते: तुम्हाला स्वतःची ओळख होते जेव्हा तुम्ही मित्रांना फोन करून सांगता, "मला वाटतं मला एक समुपदेशकाची गरज आहे. तुम्ही कोणाचे नाव सुचवता का?" कारण माझ्या पाच मित्रांची प्रतिक्रिया होती, "बाप रे! मला नाही तुझा/तुझी समुपदेशक व्हायचं." (हशा) मला असं झालं, "ह्याला काय अर्थ आहे?" आणि त्यावर त्याचं म्हणणं, "अग, मी सहज म्हटलं. तुझी ती फूटपट्टी घेऊन येऊ नकोस." मी म्हटलं, "ठीक आहे." तर मला समुपदेशक सापडली. माझी तिच्याबरोबर, डायनाबरोबर पहिली भेट -- मी सहृदयी लोकं कसे जगतात याची माझी यादी घेऊन आले होते, आणि मी (तिच्यासमोर) बसले आणि तिने विचारलं, "कशी आहेस?" आणि मी म्हटलं, "मी मस्त. मी ठीक आहे." तिने विचारलं, "काय चालू आहे?" आणि ही समुपदेशक दुसऱ्या समुपदेशकांवर उपचार करते, कारण आम्हाला त्यांच्याकडे जायची गरजच असते, कारण त्यांच्या मुर्खपणा मोजण्याच्या पट्ट्या चांगल्या असतात. (हशा) आणि मी म्हटलं, "हे बघ, मी झगडते आहे." आणि तिने विचारलं, "काय झगडा आहे?" मी म्हटलं, " म्हणजे मला अगतिकतेबद्दल प्रश्न आहे." आणि मला माहित्येय की अगतिकता हे शरम आणि भीतीचं आणि स्वत्वासाठीच्या झगड्याचं मूळ आहे. पण असं दिसतयं की (अगतिकता) हेच आनंद, सर्जनशीलता, आपलेपणा, प्रेम यांचं जन्मस्थान आहे. आणि मला वाटतं मला प्रॉब्लेम आहे, आणि मला मदतीची गरज आहे. आणि मी म्हटलं, "पण हे बघ: इथे काही कौटुंबिक प्रश्न, लहानपणीच्या (शोषणाच्या) आठवणी हा प्रकार नाही." (हशा) "मला फक्त काही उपाय हवे आहेत." (हशा) (टाळ्या) धन्यवाद. आणि तिने मान डोलावली. (हशा) आणि मग मी म्हटलं, " हे वाईट आहे ना?" आणि (त्यावर) ती म्हणाली, "हे चांगलं ही नाही आणि वाईटही." (हशा) "हे आहे हे असं आहे." आणि मी म्हटलं, "अरे माझ्या देवा! हे फार तापदायक ठरणार असं दिसतंय." (हशा) आणि ते ठरलं ही आणि नाही ही. आणि त्याला एक वर्षं लागलं. आणि तुम्हाला माहित्येय की अशी काही लोकं असतात , ज्यांना जेव्हा लक्षात येतं की अगतिकता आणि हळवेपणा गरजेचा आहे, तेव्हा ते शरण जातात आणि (या गोष्टी) आपल्याशा करतात. एक: मी ती नव्हे, आणि दोन: मी असल्या लोकांशी मैत्री देखील करत नाही. (हशा) माझ्यासाठी ही वर्षभराची लढाई ठरली. ती जणू कुस्तीच होती. अगतिकता मला ढकलत होती आणि मी जोर लावून प्रतिकार करत होते. मी कुस्ती हारले, पण माझं आयुष्य परत जिंकले. आणि मग मी पुन्हा संशोधनाकडे वळले आणि पुढची दोन वर्ष हे समजून घेण्यात घालवली की ती , सहृदयी लोकं कोणते पर्याय निवडतात, आणि ते अगतिकतेचा कसा वापर करतात. आपण अगतिकतेशी इतके का झगडत असतो? अगतिकतेशी झगडणारी मी एकटीच आहे का? नाही. तर मी हे शिकले. आपण अगतिकतेला बधीर करतो -- जेव्हा आपण कशाची तरी वाट पहात असतो. हे मजेशीर आहे, मी ट्विटर आणि फेसबुकवर विचारले असे की, "तुम्ही अगतिकतेची व्याख्या कशी कराल? तुम्हाला कशामुळे अगतिक वाटते?" आणि दीड तासात मला दीडशे प्रतिसाद आले. कारण मला हे जाणून घ्यायचं होतं की लोकांना काय वाटतं. माझ्या नवऱ्याला मदत मागणं कारण मी आजारी आहे आणि आमचं नवीन लग्न झालंय; नवऱ्याशी सेक्सला सुरुवात करणं; बायकोशी सेक्सला सुरुवात करणं; नकार पचवणं; कोणालातरी डेटसाठी विचारणं; डॉक्टरच्या निदानाची वाट पाहणे; नोकरी जाणे; लोकांना कामावरून काढून टाकणे -- ह्या जगात आपण राहतो. आपण एका अगतिक (करणाऱ्या)जगात राहतो. आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचा एक मार्ग म्हणजे आपण अगतिकतेला दाबून टाकतो. आणि मला वाटते याला पुरावा आहे -- आणि हा पुरावा असण्याचं एकमेक कारण नव्हे, माझ्या मते हे सर्वात मोठं कारण आहे -- अमेरिकन इतिहासातली आपली सर्वाधिक कर्जात बुडलेली, स्थूल, व्यसनी आणि औषधं खाणारी वयस्क अमेरिकन पिढी आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे -- आणि हे मी संशोधनातून शिकले -- की तुम्ही भावनांना वेगवेगळया करून बधीर करू शकत नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की, ह्या साऱ्या वाईट गोष्टी आहेत. ही अगतिकता, हे दुःख, ही शरम, ही भीती, ही निराशा. मला ह्या भावना जाणवायला नको आहेत. मी दोन ग्लास बीयर पिणार आणि चिकन बिर्याणी खाणार. (हशा) मला ह्या भावना जाणवायला नको आहेत. आणि मला माहित्येय की हे ओळखीचं हसू आहे. मी तुमच्या आयुष्यांत घुसखोरी करून पोट भरते. देवा! (हिला कसं कळलं?) (हशा) तुम्ही केवळ त्या दुःखद जाणीवा बधीर करू शकत नाही त्या बरोबर आपल्या भावनाही बधीर होतात. तुम्ही निवडकपणे असंवेदनशील होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा आपण त्या (दुःखद जाणीवा) दडपतो, तेव्हा आपण आनंद दडपतो, आपण कृतज्ञता दडपतो, आपण सुख दडपतो. मग आपण केविलवाणे होतो, आणि अर्थ आणि उद्देश शोधू लागतो, आणि मग आपल्याला अगतिक वाटते, आणि मग आपण पुन्हा दोन ग्लास बीयर पितो आणि चिकन बिर्याणी हाणतो. आणि एका दुष्टचक्राची सुरुवात होते. एक गोष्ट ज्याचा आपण विचार करावा असं मला वाटतं ती म्हणजे आपण का आणि कसे बधीर होतो. आणि हे केवळ व्यसन असायला हवं असं नाही. दुसरी एक गोष्ट आपण करतो ती म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट नियमित करायला जातो. धर्म ही एक विश्वास आणि चमत्कारावर असलेली श्रद्धा न राहता एक पक्की गोष्ट झाली आहे. मी बरोबर, तू चूक. गप्प बस. विषय संपला. अगदी पक्कं. आपण जितके जास्त भितो, तितके अगतिक होतो, आणि मग अजून जास्ती भितो. आजचं राजकारण हे असं दिसतं. आता कोणी चर्चा करताना दिसत नाही. कोणताही संवाद नसतो. असतात ते फक्त दोषारोप. तुम्हाला माहित्येय संशोधनात आरोपाची व्याख्या कशी करतात? दुःख आणि अस्वस्थतेला वाट मोकळी करून देण्याचा एक मार्ग. आपण परिपूर्णतेचा ध्यास घेतो. जर कोणाला आपलं आयुष्य असं दिसायला हवं असेल तर ते मला, पण तसं होत नसतं. कारण आपण काय करतो तर, आपल्या ढुंगणावरची चरबी काढून आपल्या गालावर चढवायला जातो. (हशा) जे माझी इच्छा आहे की १०० वर्षानंतर लोकं (जेव्हा) मागे वळून बघतील तेव्हा, "वाव." म्हणतील. (हशा) आणि सर्वात भयंकर म्हणजे आपण आपल्या मुलांना परिपूर्ण बनवू पाहतो. मी सांगते आपल्याला मुलांबद्दल काय वाटतं ते. जेव्हा ती या जगात येतात तेव्हा संघर्ष करण्यासाठी सक्षम असतात. आणि जेव्हा तुम्ही त्या परिपूर्ण बाळाला हातात घेता, तुमचं काम हे म्हणणं नसतं की, "बघा तिच्याकडे, ती परिपूर्ण आहे. माझं काम आहे तिला परिपूर्ण ठेवणं -- हे बघणं की कशी ती ५वीत टेनिस टीम मध्ये निवडली जाईल आणि ७वीत गेल्यावर आय आय टी त." हे आपलं काम नाहीये. आपलं काम आहे (तिच्याकडे) पाहून म्हणणं की, "माहित्येय? तू परिपूर्ण नाहीयेस, आणि तुला संघर्षासाठी घडवलंय, पण प्रेमावर आणि आपलेपणावर तुझा हक्क आहे." हे आपलं काम आहे. मला अशी वाढवलेली मुलांची एक पिढी दाखवा, आणि मला वाटतं आजचे आपले सगळे प्रश्न सुटतील. आपण सोंग घेतो की आपल्या कृतीचा इतरांवर काही परिणाम होत नाही. आपण असे व्यक्तिगत आयुष्यात वागतो. आणि व्यावसायिक पातळीवरही -- मग ती आर्थिक मदत असो किंवा तेल गळती, किंवा (वस्तू) माघारी बोलावणे -- आपण दाखवतो की आपल्या कृतीमुळे लोकांवर फार मोठा परिणाम होत नाहीये. मी कंपन्यांना असं सांगेन की, हे काही तुमचा पहिला प्रदर्शनातला स्टॉल नाहीये. आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही सच्चाईने आणि सचोटीने वागा आणि म्हणा, "आम्ही क्षमा मागतो. आम्ही सर्वं ठीक करू." पण अजून एक मार्ग आहे, आणि तो सांगून मी थांबेन. हे, जे मला सापडलंय: स्वतःला पारदर्शक बनवा, (लोकांना) आरपार बघू द्या, तुमच्या अगतिकतेसकट (तुम्हाला) बघू द्या; संपूर्ण हृदयापासून प्रेम करा, जरी कशाचीच खात्री नसेल तरीही -- आणि हे सर्वात अवघड आहे, एक पालक म्हणून मी तुम्हाला सांगते, हे अत्यंत कठीण आहे -- त्या क्षणी कृतज्ञ आणि आनंदी राहणं जेव्हा भीती वाटत असते, जेव्हा आपल्याला नवल वाटतं, "मी तुझ्यावर एवढं प्रेम करू शकेन का? यावर इतका गाढ विश्वास ठेवू शकते का? याबद्दल मी इतकी आग्रही असू शकते का?" जरा क्षणभर थांबून, विपरीत कल्पनाविलास करण्याऐवजी, असं म्हणणं, "मी किती आभारी आहे, कारण मी इतकी/इतका अगतिक आहे याचाच अर्थ मी जिवंत आहे." आणि शेवटचे आणि माझ्या मते सर्वात महत्वाचे, मी पुरेशी आहे यावर विश्वास ठेवणे. कारण जेव्हा आपण मी पुरेशी आहे, या भावनेने काम सुरु करतो, तेव्हा आपण आरडाओरड थांबवतो आणि ऐकायला सुरुवात करतो, आपण आपल्या आजूबाजूच्यांशी अधिक दयाळू आणि सज्जनपणे वागतो, आणि स्वतःशी ही. मला एवढेच सांगायचे आहे. धन्यवाद. (टाळ्या)