अवर ऑफ कोड | नृत्य पार्टी: गुणधर्म माझं नाव मारिया आहे. मी वॉशिंग्टन विद्यापीठात तिसऱ्या वर्षाला आहे. आणि मी अमेझॉनची फ्युचर इंजिनिअर आहे. मला कॉम्प्युटर सायन्स खूप आवडतं कारण ते समस्यांचं निराकरण करतं आणि मूलभूत विचारांना चालना देतं. आणि कित्येक तासांच्या मेहनतीनंतर त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं आणि समाधानकारक केल्याची जाणीव होते. आतापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नर्तकांसोबत खेळण्याची संधी मिळाली आहे. आणि तुम्ही त्यांना विविध प्रकारचे नृत्याविष्कार करण्यासाठी 'प्रोग्रॅम' केलं आहे. पण हे नृत्याविष्कार प्रत्यक्षात कसं काम करत असतील? प्रत्येक नृत्याविष्कार, अनेक फोटोंच्या मालिकांचा बनलेला असतो. त्यांना 'फ्रेम्स' असे म्हणतात. प्रत्येक फ्रेम तिच्या आधीच्या फ्रेमपेक्षा थोडीशी वेगळी असते. तुमचा प्रोग्रॅम रन झाला की संगणक एकामागून एक फ्रेम दाखवत जातो. त्या इतक्या वेगाने दाखवल्या जातात की त्यामुळं नर्तक हलत आहे असं वाटतं. प्रत्येक अॅनिमेशनमागे हेच रहस्य असते. तुम्ही केवळ तुमच्या नर्तकांचे नृत्याविष्कारच नव्हे तर तुम्ही तुमच्या नर्तकांचे गुणधर्मसुद्धा बदलू शकता. विविध गुणधर्म म्हणजे नर्तकांची पडद्यावरील स्थिती, नर्तकाचा आकार, आणि नर्तकाचा रंग वगैरे. नर्तकाचे गुणधर्म बदलण्यासाठी तुम्ही "सेट" ब्लॉकचा वापर करा. चला तर मग, "सेट" ब्लॉक वापरून आपल्या नर्तकांचा आकार कमी करूया. सर्वांत आधी, तुमच्या प्रोग्रॅममध्ये सेट ब्लॉक ओढून आणा. मग, ज्या नर्तकाला तुम्हाला बदलायचे आहे त्याची निवड करा. आणि येथे आकार टाईप करा, तो तुम्हाला पडद्यावर दिसून येईल. संपूर्ण आकार 100 आहे. जर तुम्ही एक छोटी संख्या निवडलीत तर नर्तक अधिक छोटा दिसेल. नर्तक जितका छोटा असेल, तितका दूर दिसेल. बॅकअप नर्तक बनवायचा हा एक चांगला मार्ग आहे. सेट ब्लॉक वापरून, तुम्ही नर्तकाच्या मितीसुद्धा बदलू शकता. उदा. गोल फिरणे, स्थान, आणि रंग. या गुणधर्मांमध्ये थोडेसे बदल केल्याने, तुम्ही सर्व प्रकारचे बदल करण्यासाठी सक्षम व्हाल आणि त्यांना गाण्याच्या विविध भागांशी जोडू शकाल. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या नर्तकाचेच गुणधर्म निश्चित करू शकता. तुमचा सेट ब्लॉक हा "Make a new dancer" ब्लॉकच्या नंतर येत असल्याचे सुनिश्चित करा. प्रयोग करण्यास अजिबात संकोच करू नका, सर्जनशील व्हा. आणि मजा करा.