एक शिल्पकार छिन्नी चालवून एखादी मूर्ती घडवतो आहे, अशी कल्पना करा. मायकेलअँजेलोने याचं सुंदर वर्णन केलं आहे. तो म्हणतो, दगडाच्या प्रत्येक तुकड्यात एक मूर्ती दडलेली असते. ती शोधणं हेच शिल्पकाराचं काम. पण हेच काम त्याने विरुद्ध दिशेकडून केलं तर? कामाची सुरुवात दगडापासून न करता, धुळीच्या ढिगाऱ्यापासून केली तर? धुळीचे कोट्यवधी कण एकत्र चिकटवून मूर्ती घडवली तर? खुळचट कल्पना.. ठाऊक आहे मला. आणि कदाचित अशक्य कोटीतलीही. धुळीपासून मूर्ती बनवण्याचा एकच मार्ग आहे. मूर्तीनेच स्वतःला घडविणे. आपण त्या कोट्यवधी धूलिकणांना जबरदस्तीने एकत्र यायला भाग पाडू शकलो तरच ही मूर्ती घडेल. ऐकायला विचित्र वाटेल, पण मी माझ्या प्रयोगशाळेत अगदी अशाच प्रकारच्या प्रश्नावर काम करतो. मी दगड वापरत नाही. अतिसूक्ष्म पदार्थ वापरतो. हे अद्भुत पदार्थ अशक्य वाटतील इतके सूक्ष्म असतात. इतके सूक्ष्म, की हा कंट्रोलर म्हणजे जर एक अतिसूक्ष्म कण मानला, तर मानवी केसाचा आकार, ही खोली भरून टाकण्याइतका असेल. हे कण म्हणजे नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्राचा गाभा आहे. याविषयी आपण सर्वांनी ऐकलंच असेल. त्यामुळे कसं जग बदलून जाणार आहे, तेही. माझ्या पदव्युत्तर शिक्षणाचा काळ हा नॅनोटेक्नॉलॉजीत काम करणाऱ्यांसाठी सर्वात मनोहर काळ होता. अत्यंत महत्त्वाचे शोध सतत लागत होते. परिषदा गजबजून जात होत्या. संस्था संशोधनासाठी भरपूर पैसे ओतत होत्या. याचं कारण असं, की जेव्हा पदार्थ अतिशय सूक्ष्म होतो, तेव्हा त्याचं भौतिकशास्त्र सर्वसाधारण पदार्थांपेक्षा निराळं होतं. त्याला क्वांटम मेकॅनिक्स म्हणतात. हे शास्त्र सांगतं, की त्या सूक्ष्म कणांमध्ये छोटे छोटे बदल करून त्यांचे गुणधर्म बदलता येतात. उदाहरणार्थ, त्या कणांमध्ये काही अणु वाढवणे किंवा कमी करणे, अथवा तो पदार्थ वळवणे. म्हणजे हे सर्वोत्कृष्ट साधन झालं. त्यामुळे असं वाटलं, की आपण काय वाट्टेल ते करू शकतो. आणि आम्ही ते करत होतोच. आम्ही, म्हणजे माझ्या वेळच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांची पिढी. आम्ही ते अतिसूक्ष्म कण वापरून वेगवान संगणक बनवण्याचा प्रयत्न करीत होतो. आम्ही "क्वांटम डॉट्स" बनवीत होतो, जे भविष्यकाळात शरीरात जाऊन रोग शोधून तो बरा करतील, असे. काही शास्त्रज्ञ कार्बन नॅनोट्यूब्सपासून अवकाशात जाणारा एलिव्हेटर करू पाहात होते. खरं सांगतोय. हवं तर शोधून पहा. आम्हांला वाटलं होतं, की याचा परिणाम संगणकापासून औषधांपर्यंत सर्व विज्ञान, तंत्रज्ञानांवर होईल.