एक शिल्पकार छिन्नी चालवून एखादी मूर्ती घडवतो आहे, अशी कल्पना करा. मायकेलअँजेलोने याचं सुंदर वर्णन केलं आहे. तो म्हणतो, दगडाच्या प्रत्येक तुकड्यात एक मूर्ती दडलेली असते. ती शोधणं हेच शिल्पकाराचं काम. पण हेच काम त्याने विरुद्ध दिशेकडून केलं तर? कामाची सुरुवात दगडापासून न करता, धुळीच्या ढिगाऱ्यापासून केली तर? धुळीचे कोट्यवधी कण कसेतरी एकत्र चिकटवून मूर्ती घडवली तर? खुळचट कल्पना.. ठाऊक आहे मला. आणि कदाचित अशक्य कोटीतलीही. धुळीपासून मूर्ती बनवण्याचा एकच मार्ग आहे. मूर्तीनेच स्वतःला घडविणे. आपण त्या कोट्यवधी धूलिकणांना जबरदस्तीने एकत्र यायला भाग पाडू शकलो तरच ही मूर्ती घडेल. ऐकायला विचित्र वाटेल, पण मी माझ्या प्रयोगशाळेत अगदी अशाच प्रकारच्या प्रश्नावर काम करतो. मी दगड वापरत नाही. अतिसूक्ष्म पदार्थ वापरतो. हे अद्भुत पदार्थ अशक्य वाटतील इतके सूक्ष्म असतात. इतके सूक्ष्म, की हा कंट्रोलर म्हणजे जर एक अतिसूक्ष्म कण मानला, तर मानवी केसाचा आकार, ही खोली भरून टाकण्याइतका असेल. हे कण म्हणजे नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्राचा गाभा आहे. याविषयी आपण सर्वांनी ऐकलंच असेल. त्यामुळे कसं जग बदलून जाणार आहे, तेही. माझ्या पदव्युत्तर शिक्षणाचा काळ हा नॅनोटेक्नॉलॉजीत काम करणाऱ्यांसाठी सर्वात मनोहर काळ होता.