वयाच्या आठव्या वर्षी
प्रथमच मी हवामान बदल किंवा
जागतिक तापमानवाढ याविषयी ऐकलं.
आपण मानवप्राणी ज्या पद्धतीने जगतो,
त्याचा हा परिणाम आहे, असं मला समजलं.
ऊर्जा वाचवण्यासाठी दिवे बंद कर, आणि
नैसर्गिक साधनं वाचवण्यासाठी
कागदाचा पुनर्वापर कर,
असं मला सांगितलं गेलं.
त्यावेळी मला हे विचित्र वाटल्याचं आठवतं.
मानव हा इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी.
त्याच्याजवळ पृथ्वीचं हवामान बदलण्याची
क्षमता असू शकते?
कारण आपण जर खरोखरच तसं करत असतो,
आणि हे खरंच घडलं असतं,
तर आपल्याला बोलायला दुसरा विषयच नसता.
टी. व्ही. लावला, की फक्त
हाच विषय दिसला असता.
ठळक बातम्या, रेडिओ, वर्तमानपत्रं,
कुठेच दुसरं काही ऐकायला किंवा
वाचायला मिळालं नसतं.
जागतिक महायुद्ध सुरु असल्यासारखं.
पण याविषयी कधीच कोणी काही बोललं नाही.
जर जीवाश्म इंधन वापरणं इतकं वाईट असेल,
त्यामुळे आपलं अस्तित्व धोक्यात येत असेल,
तर आपण पूर्वीसारखेच कसे वागत राहू शकतो?
निर्बंध का घातले गेले नाहीत?
ते बेकायदेशीर का ठरवलं गेलं नाही?
मला काही याचा ताळमेळ लागला नाही.
यात फार खोटेपणा होता.
यामुळे वयाच्या अकराव्या वर्षी
मी आजारी पडले.
मला नैराश्य आलं.
मी बोलणं बंद केलं.
खाणं बंद केलं.
दोन महिन्यांत माझं दहा किलो वजन कमी झालं.
यानंतर निदान झालं.
असपरगर्स सिंड्रोम (स्वमग्नता),
ओ सी डी (अत्याग्रही विकार)
आणि निवडक मूकपणा.
म्हणजे बोलणं गरजेचं आहे असं वाटतं,
तेव्हाच मी बोलते.
आजची वेळ तशीच आहे.
(टाळ्या)
स्वमग्नतेच्या छटा असणाऱ्या व्यक्तींना
सर्वकाही काळं/पांढरं
अशा दोन टोकांचं दिसतं.
आम्हांला खोटं बोलता येत नाही.
आणि तुमच्यासारख्या लोकांना आवडणाऱ्या या
सामाजिक खेळात भाग घेणं आवडत नाही.
(हशा)
मला वाटतं, बऱ्याच बाबतींत
आम्ही स्वमग्न व्यक्तीच निरोगी असतो,
आणि इतर लोक फार विचित्र असतात.
(हशा)
खासकरून पृथ्वीचं अस्तित्व
टिकून राहण्याच्या या समस्येबाबतीत.
म्हणजे सगळे फक्त बोलत राहतात, हवामान बदल
हा आपल्या अस्तित्वाला धोका आहे,
हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे वगैरे.
पण कृती मात्र पूर्वीसारखीच करत राहतात.
हे काही मला समजत नाही.
कारण, उत्सर्जन थांबायला हवं असेल,
तर आपणच ते थांबवायला हवं.
हे काळ्यापांढऱ्याइतकं स्पष्ट आहे.
जीवनमरणाच्या प्रश्नात अधलीमधली
करडी छटा नसते.
आपली संस्कृती पुढे सुरु तरी राहील,
किंवा संपेल तरी.
आपल्याला बदलावं लागेल.
स्वीडनसारख्या श्रीमंत देशांना दरवर्षी
निदान १५ टक्के उत्सर्जन कमी करण्याची
सुरुवात करावी लागेल.
म्हणजे आपण जागतिक तापमान वाढ
दोन अंशाखाली रोखू शकू.
आणि नुकतंच IPCC ने दाखवून दिल्याप्रमाणे,
ही वाढ दीड अंशाखाली ठेवली, तर
हवामानावर होणारे परिणाम
मोठ्या प्रमाणात कमी करता येतील.
आपण याची फक्त कल्पना करू शकतो.
आपली सर्व माध्यमं आणि नेते,
या विषयाखेरीज दुसरं काही
बोलूच कसे शकतील, असं आपल्याला वाटेल,
पण ते तर या विषयाचा उल्लेखही करत नाहीत.
वातावरणात भरून राहिलेल्या
हरितगृह वायुंचाही कोणी उल्लेख करत नाही.
हवेच्या प्रदुषणामागे तापमान वाढ
दडली आहे, याचाही नाही.
जीवाश्म इंधन वापरणं बंद झाल्यावरदेखील
ही वाढ तशीच राहणार आहे.
आणि ती कदाचित .५ ते १.१ अंश सेल्सियस
इतकी जास्त असू शकेल.
हेही कुठे फारसं बोललं जात नाही, की
जीवसृष्टी प्रचंड प्रमाणावर नष्ट होण्याची
सहावी फेरी सध्या सुरु आहे.
दिवसागणिक सजीवांच्या २०० प्रकारच्या जाती
नष्ट होताहेत.
सजीवजाती नष्ट होण्याच्या
सर्वसाधारण मानल्या गेलेल्या दरापेक्षा
हा दर १,००० ते १०,००० पटीने जास्त आहे.
फारसा न बोलला गेलेला आणखी एक विषय,
हवामानविषयक न्याय किंवा समानता.
पॅरिस करारात या गोष्टी
स्पष्टपणे मांडल्या आहेत,
आणि जगभरात परिणाम घडवून आणण्यासाठी
त्या गरजेच्या आहेत. म्हणजे,
श्रीमंत देशांनी
उत्सर्जनाच्या सध्याच्या वेगानुसार,
६ ते १२ वर्षांत
आपली उत्सर्जन पातळी
शून्यावर आणली पाहिजे.
यामुळे गरीब देशांना
त्यांचा जीवनस्तर उंचावण्याची संधी मिळेल.
श्रीमंत देशांसारख्याच मूलभूत सुविधा
उभारता येतील.
उदाहरणार्थ, रस्ते, शाळा, रुग्णालये,
पिण्याचं स्वच्छ पाणी, वीजपुरवठा इत्यादि.
कारण, भारत किंवा नायजेरिया सारख्या देशांनी
हवामानाच्या संकटाची चिंता वाहावी
अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो?
सर्व गरजा पूर्ण झालेले आपले देश
सेकंदभरसुद्धा त्या संकटाचा,
किंवा पॅरिस करारानुसारच्या जबाबदाऱ्यांचा
विचार करत नाहीत.
तर मग, आपण आपलं उत्सर्जन कमी का करत नाही?
प्रत्यक्षात ते वाढतच चाललं आहे. असं का?
आपण जाणूनबुजून जीवजाती नष्ट करतो आहोत का?
आपण दुष्ट आहोत का?
नाही, अर्थातच नाही.
लोक पूर्वीसारखंच सगळं करत राहतात,
कारण बऱ्याचशा लोकांना
आपल्या रोजच्या दिनक्रमाचे
काय परिणाम होतात,
याची मुळीच कल्पना नसते.
आणि तात्काळ बदल घडायला हवा,
हेही त्यांना माहित नसतं.
सर्वांना ते माहित आहे, असं आपल्याला वाटतं,
पण प्रत्यक्षात माहित नसतं.
कारण, ते आपल्याला समजणार तरी कसं?
जर हे संकट खरोखरच असतं,
आणि ते आपल्या उत्सर्जनामुळे आलेलं असतं,
तर निदान काहीतरी खुणा दिसल्या असत्या.
नुसते शहरांतून आलेले पूर नव्हेत,
तर लाखो प्रेतं,
उध्वस्त इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली
गाडले गेलेले देश.
काहीतरी निर्बंध दिसले असते.
पण ते दिसत नाहीत.
आणि कोणी त्यांच्याविषयी बोलत नाही.
आणीबाणीच्या बैठका, ठळक बातम्या,
ब्रेकिंग न्यूज, यापैकी काही नाही.
आपल्यावर संकट आलं आहे, असं
कोणाच्याही वागण्यातून दिसत नाही.
इतकंच काय, बरेचसे हवामान शास्त्रज्ञ,
आणि पर्यावरणवादी राजकारणीसुद्धा
जगभर विमानप्रवास करतात,
मांस आणि दुग्धजन्य पदार्थ खातात.
मी जर शंभर वर्षे जगले,
तर २१०३ साली मी जिवंत असेन.
आज आपण जेव्हा भविष्याचा विचार करतो,
तेव्हा तो २०५० च्या पुढे जाऊ शकत नाही.
तोपर्यंत तर माझं अर्धं आयुष्यदेखील
जगून झालेलं नसेल.
पुढे काय होणार?
२०७८ साली माझी पंचाहत्तरी असेल.
मला मुलं, नातवंडं असलीच, तर कदाचित
त्या दिवशी ती माझ्याजवळ असतील.
कदाचित ते मला तुमच्याविषयी विचारतील.
म्हणजे,
२०१८ साली पृथ्वीवर असलेल्या लोकांविषयी.
कदाचित ते विचारतील, की त्यावेळी
हातात वेळ शिल्लक असूनही
तुम्ही काहीच का केलं नाही?
आज आपण जे काही करू, किंवा करणार नाही,
त्याचा परिणाम माझ्या पूर्ण आयुष्यावर,
माझ्या मुला-नातवंडांवर होणार आहे.
आज आपण केलेल्या किंवा न केलेल्या गोष्टी
भविष्यकाळात माझ्या पिढीला
पुसून टाकता येणार नाहीत.
म्हणून या वर्षी ऑगस्टमध्ये
जेव्हा शाळा सुरु झाली,
तेव्हा मी ठरवलं, की आता हे फार झालं.
मी स्वीडनच्या पार्लमेंटबाहेर जाऊन बसले.
हवामानासाठी मी शाळेत संप केला.
काही लोक म्हणतात, की यापेक्षा
मी शाळेत जायला हवं.
काही लोक म्हणतात, की मी शिकून
हवामानशास्त्रज्ञ व्हावं,
म्हणजे या हवामानाच्या समस्येवर
मला उपाय शोधता येईल.
पण ही समस्या कधीच सोडवून झाली आहे.
सर्व माहिती आणि उपाय आपल्याजवळ आहेत.
फक्त आपण जागं व्हायला हवं,
आणि बदलायला हवं.
आणि जो भविष्यकाळ लवकरच नष्ट होणार आहे,
त्यासाठी मी शाळेत जाऊन अभ्यास का करू?
कारण भविष्यकाळ वाचवण्यासाठी आज
कोणीही काहीही करताना दिसत नाही.
शाळेत जाऊन माहिती मिळवण्यात काय अर्थ आहे?
कारण, याच शिक्षणपद्धतीतून
निर्माण झालेल्या उत्कृष्ठ विज्ञानाने
पुरवलेली अत्यंत महत्त्वाची माहिती
आपल्या राजकारण्यांना आणि
समाजाला निरुपयोगी वाटते.
काही लोक म्हणतात, की
स्वीडन हा एक छोटासा देश आहे.
आणि आपण काहीही केलं
तरी काही फरक पडणार नाही.
पण मला वाटतं, की जर नुसती
काही मुलं, काही आठवडे शाळेत न जाणं
ही जगभर ठळक बातमी होऊ शकते, तर
कल्पना करा, आपण सर्वांनी मनात आणलं,
तर आपण काय काय करू शकू.
(टाळ्या)
आता माझं भाषण संपत आलं आहे.
अशा वेळी वक्ते आशावाद,
सौरशक्ती, पवन शक्ती,
पुनर्वापरावर आधारित अर्थव्यवस्था
अशा गोष्टींविषयी बोलू लागतात.
पण मी तसं करणार नाही.
तीस वर्षं आपण उत्साहवर्धक भाषणं देतो आहोत,
सकारात्मक कल्पना विकतो आहोत.
माफ करा, त्यातून काही निष्पन्न होत नाही.
कारण तसं झालं असतं,
तर आतापर्यंत उत्सर्जन कमी झालं असतं.
तसं झालेलं नाही.
आणि हो, आपल्याला आशावादी राहिलं पाहिजे.
अर्थात. आशा हवीच.
पण आशेपेक्षाही जास्त गरज आहे ती कृतीची.
आपण कृतीला सुरुवात केली,
की सर्वत्र आशा दिसेल.
तेव्हा आशा शोधण्याऐवजी
कृतीचा शोध घ्या.
कृती केल्यामुळेच आशा निर्माण होणार आहे.
आज आपण दर दिवशी
दहा कोटी बॅरल्स खनिज तेल वापरतो.
त्यात बदल घडवून आणणारी धोरणं
अस्तित्वात नाहीत.
ते तेल भूगर्भातच ठेवणारे नियम नाहीत.
नियम पाळून जगलो, तरीही आपण
पृथ्वीचं रक्षण करू शकत नाही.
कारण मुळात ते नियम बदलायला हवे आहेत.
सर्वकाही बदलायला हवं, आणि
या बदलाची सुरुवात आजच व्हायला हवी.
धन्यवाद.
(टाळ्या)