अजूनही जगभरात हिवताप प्राणघातक समजला जातो. गेल्या वीस वर्षांत आपण पुष्कळ प्रगती केली असली, तरी जगाच्या अर्ध्या लोकसंख्येला हिवतापाचा धोका संभवतो. दर दुसऱ्या मिनिटाला दोन वर्षांखालील एक मूल हिवतापामुळे प्राण गमावतं. आपली प्रगती खुंटलेली आहे, यात शंका नाही. हिवतापाचा सामना करताना आपल्यापुढे अनेक आव्हानं असतात. यापैकी एक समस्या म्हणजे हिवतापाचा संसर्ग झालेले लोक शोधून काढणे. ज्या लोकांजवळ थोडी प्रतिकारशक्ती असते, त्यांना संसर्ग झाला, तर त्यांना काही लक्षणं दिसून न येता इतरांना त्याची लागण होते. ही एक मोठी समस्या आहे. कारण हे लोक शोधणार कसे? हे गवताच्या भाऱ्यातून सुई शोधण्याइतकं अवघड आहे. गेली काही वर्षे शास्त्रज्ञ ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताहेत. पण आज मी तुम्हांला सांगणार आहे, की या प्रश्नाचं उत्तर नेहमीच अक्षरशः आपल्या नाकासमोर होतं. आपली सुरुवात जरा बोजड झाली. अगदी महत्त्वाच्या आकडेवारीसकट. तेव्हा आता आपण सर्वजण जरा विश्रांती घेऊ. म्हणजे मलाही जरा आराम मिळेल. आता आपण सगळे एक दीर्घ श्वास घेऊ. वा. (हसतात) आणि हं.. आता श्वास सोडला. बरं. आता हे पुन्हा एकदा करा. पण यावेळी फक्त नाकाने. आणि यावेळी तुमच्या भोवतालच्या हवेचा नीट अनुभव घ्या. खास करून, तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा नीट वास घ्या. तुम्ही त्यांना ओळखत नसलात तरी चालेल. वाका, आणि त्यांच्या काखेत तुमचं नाक घाला. हो, ते ब्रिटिश शिष्टाचार जरा बाजूला ठेवा. नीट वास घ्या. कसला वास येतो पहा. (हशा) आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला निरनिराळा अनुभव आला असणार. काहींना चांगला वास आला असेल. कदाचित अत्तराचा वास. काहींना मात्र फारसा चांगला वास आला नसेल. कदाचित कोणाच्या श्वासाचा गंध किंवा शरीरगंध आला असेल. कदाचित स्वतःचाच शरीरगंध आला असेल. (हशा) पण आपल्यापैकी काहींना, विशिष्ट लोकांचे वास न आवडण्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे. ऐतिहासिक काळापासून, विशिष्ट वास काही रोगांशी निगडित आहेत. उदाहरणार्थ, टायफॉईडचा वास भाजलेल्या ब्राऊन पावासारखा येतो. हा वास छान आहे, ना? पण सगळेच वास इतके छान नसतात. क्षयरोगाचा वास शिळ्या बियर सारखा येतो. पिवळ्या तापाचा वास, खाटकाच्या दुकानातल्या कच्च्या मांसासारखा येतो. रोगांची वर्णनं करण्याकरता असेच शब्द वापरलेले दिसतात: सडका, घाण, कुजका, नाकाला झोंबणारा. यामुळे शरीरगंधाची जराशी बदनामी झाली आहे. मी जर म्हटलं, "तुमचा वास येतो", तर हे तुम्हांला कौतुक वाटेल का? पण खरंच, शरीराला वास येतो. नुकतंच तुम्ही पाहिलंत, सर्वांना वास येतो. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. आता मी हे सत्य पूर्णपणे उलटवणार आहे. सकारात्मक विचार करून, त्या वासाचा चांगला उपयोग केला तर? आपण आजारी असताना शरीरातून स्रवणारी रसायने ओळखून, त्यांचा वापर रोगनिदानासाठी केला तर? हे काम करण्यासाठी आपल्याला चांगले संवेदक विकसित करावे लागतील. पण असे सर्वोत्कृष्ठ संवेदक जगात अस्तित्वात आहेत. त्यांना आपण प्राणी म्हणतो. वास घेणं हे प्राण्यांचं शरीरकार्य आहे. त्यांचं रोजचं जीवन नाकावर अवलंबून असतं. भोवतालच्या परिस्थितीच्या संवेदनेतून त्यांना जगण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळते. कल्पना करा, तुम्ही एक डास आहात. तुम्ही बाहेरून उडत आलात, आणि या खोलीत शिरलात. आता तुम्ही एका जटिल स्वरूपाच्या जगात शिरणार आहात. तुमच्यावर सर्व बाजूंनी वास आदळणार आहेत. आपण आताच पाहिलं, की सर्वांच्या अंगाला वास येतो. आपल्यापैकी प्रत्येकजण निरनिराळी बाष्पशील रसायने बनवतो. शरीरगंध नावाचं एकच रसायन नसतं. त्यात अनेक रसायनं असतात. पण वास हा फक्त तुमचाच नव्हे. तुमची खुर्ची, जमिनीवरचं कारपेट, ते जमिनीला चिकटवणारा गोंद, भिंतीवरचा रंग, बाहेरची झाडं अशा भोवतालच्या सर्व गोष्टींपासून वास निर्माण होतात. डासाला या जटिल जगात उडावं लागतं. आणि या गुंतागुंतीमधून नेमकं तुम्हांला शोधावं लागतं. आणि आपल्यापैकी प्रत्येकजण जाणतोच, चला, हात वर करा पाहू. कोणाला नेहमी डास चावतात? आणि कोणाला चावत नाहीत? हं, नेहमीच असे एकदोन खमके लोक सापडतात. त्यांना डास चावत नाहीत. पण तुम्हांला नेमकं शोधणं हे डासासाठी कठीण काम असतं. आणि याचं एकमेव कारण म्हणजे तुमचा शरीरगंध. ज्यांना डास चावत नाहीत, त्यांचा शरीरगंध आवडण्यासारखा नसतो. आपल्याला ठाऊक आहे, की (हशा) इथे स्पष्ट करायला हवं, डासांना न आवडण्यासारखा. माणसांना नव्हे. (हशा) आज आपण जाणतो, की यावर आपल्या जनुकांचं नियंत्रण असतं. डास हा फरक ओळखू शकतात, कारण त्यांची गंधक्षमता अतिशय विकसित असते. सर्व वासांच्या एकत्रित गाळातून ते वास सुटे ओळखू शकतात, आणि तुम्हांला एकट्याला चावून तुमचं रक्त शोषून घेऊ शकतात. तुमच्यापैकी एखाद्याला हिवतापाचा संसर्ग झाला असेल, तर काय होईल? आता हिवतापाचं जीवनचक्र थोडक्यात पाहू. तसं ते गुंतागुंतीचं आहे, पण यातला मूलभूत घटक म्हणजे, संसर्गासाठी प्रथम माणसाला डास चावला पाहिजे. हिवताप झालेल्या माणसाला डास चावला असता त्याच्या रक्तातला परजीवी तोंडाद्वारे डासाच्या पोटात जातो. तिथे परजीवींचे कोष तयार होतात. आणि त्यात त्यांचे पुनरुत्पादन होते. डासाच्या पोटातले कोष लाळग्रंथींमध्ये येऊन फुटतात. डास दुसऱ्या माणसाला चावला, की त्याच्या लाळेबरोबर परजीवी त्या माणसाच्या रक्तात सोडले जातात. माणसाच्या शरीरात शिरताच त्या परजीवींच्या जीवनचक्राचा पुढचा भाग सुरु होतो. प्रथम यकृतात परजीवींचा आकार बदलतो. त्यानंतर ते पुन्हा रक्तात मिसळतात. या चक्राच्या शेवटी हा माणूस संसर्ग वाहक होतो. आपण आज जाणतो, की माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचा चातुर्याने वापर करून घेऊन परजीवी फैलावत जातात, रोगप्रसार करत जातात. हिवतापाच्या प्रसार जर अशा रीतीने होत असला, तर त्याचा वासाशी संबंध असला पाहिजे. शरीरगंध महत्त्वाचा आहे. त्यामुळेच डास आपल्यामध्ये संसर्गाचं जाळं विणतात. त्यामुळे ते आपल्याला शोधतात. हे आहे माणसाच्या वापराने हिवताप फैलावण्याचे गृहितक. यावर आम्ही गेली काही वर्षं संशोधन करत आहोत. यात आम्हांला प्रथम शोधायचं होतं, की आपल्याला हिवतापाचा संसर्ग झाला असेल, तर डास आपल्याकडे जास्त आकर्षित होतात का? यासाठी आम्ही केनियामध्ये आमच्या सहकाऱ्यांसमवेत एक प्रयोग केला. प्रयोगात सहभागी झालेली मुलं एका तंबूत झोपली. त्या तंबूतले वास डासांनी भरलेल्या एका खोलीत सोडले गेले. आता डासांची हालचाल वासावर अवलंबून होती. ते आवडत्या वासाच्या जवळ गेले असते, आणि नावडत्या वासापासून दूर. त्या मुलांपैकी काहींना हिवतापाचा संसर्ग झाला होता, तर काहींना नव्हता. पण महत्त्वाचं म्हणजे, कोणत्याही मुलात तशी लक्षणं दिसत नव्हती. या प्रयोगाचे निष्कर्ष धक्कादायक होते. हिवतापाचा संसर्ग झालेली मुलं फार मोठ्या प्रमाणावर डासांना आकर्षित करत होती. या आलेखाचं स्पष्टीकरण पाहू. "मुलाकडे आकर्षित झालेल्या डासांची संख्या" इथे दोन प्रकारची आकडेवारी आहे. उपचारापूर्वी आणि उपचारानंतर. अगदी डावीकडचा हा स्तंभ संसर्ग न झालेलया लोकांचा समूह दाखवतो. उजवीकडे जाताना हे संसर्ग झालेले लोक, आणि शेवटी हे संसर्ग वाहक. या संसर्ग वाहक स्थितीमध्ये असलेले लोक सर्वात जास्त डास आकर्षित करतात. नंतर आम्ही या मुलांना औषध देऊन परजीवी नष्ट केले, आणि मग त्यांची पुन्हा तपासणी केली. त्यांचा संसर्ग बरा झाल्यावर, डासांना आकर्षित करण्याची त्यांची क्षमता नाहीशी झाली असल्याचं त्यावेळी आढळून आलं. याचा अर्थ, या व्यक्ती डासांना आकर्षित करत नव्हत्या. तर ते परजीवी त्यांना जास्त आकर्षक बनवत होते. गंध हे विजेरीच्या झोतासारखे वापरून जास्त डासांना आकर्षित करत होते. परजीवींचं जीवनचक्र सुरु राहावं हा यामागचा उद्देश. यापुढे आम्हांला शोधून काढायचं होतं, की डास नेमका कसला वास घेत होते? त्यांना काय सापडत होतं? हे शोधण्यासाठी आम्ही सहभागी मुलांचा शरीरगंध गोळा केला. आम्ही त्यांच्या पावलांभोवती पिशव्या गुंडाळल्या. त्यामुळे त्यांच्या पावलांचा बाष्पशील गंध आम्हांला साठवता आला. पावलं ही डासांसाठी फार महत्त्वाची असतात. पावलांचा वास त्यांना अतिप्रिय असतो. (हशा) खासकरून घामट पावलं. आहेत का इथे कोणाची? डासांचा हा अतिशय आवडता वास. आम्ही पावलांवर लक्ष केंद्रित केलं, आणि गंध गोळा केला. डासांची गंध संवेदना अतिशय गुंतागुंतीची असते. त्यांनी फक्त एखादं रसायन ओळखून काढलं असतं, तर ते फार चांगलं झालं असतं. पण ते तितकं सोपं नसतं. त्यांना बरीचशी रसायनं ओळखायची असतात. त्यांचं मिश्रण, प्रमाण, तीव्रता नेमकी असावी लागते. एखाद्या संगीत रचनेसारखी. एखादा स्वर चुकीचा वाजवला, फार मोठ्याने किंवा अगदी हळू वाजवला, तर ते संगीत बेसूर होतं. किंवा एखादी पाककृती. चुकीचा जिन्नस वापरला, ती खूप जास्त किंवा कमी वेळ शिजवली, तर तिची चव बिघडते. गंधाचं तसंच आहे. गंध म्हणजे योग्य प्रमाणात एकत्र आलेली ठराविक रसायनं. प्रयोगशाळेतली यंत्रं अशा प्रकारची रसायनं ओळखू शकत नाहीत. ते फार कठीण असतं. पण प्राणी हे काम करू शकतात. आम्ही प्रयोगशाळेत डासांच्या स्पर्शिकांना सूक्ष्म भारवाही तारा लावतो. कल्पना करा, हे किती किचकट असेल. (हशा) आम्ही त्या तारा स्पर्शिकांमधल्या प्रत्येक पेशीला लावतो. हे तर अविश्वसनीय आहे. हे काम करताना शिंक येता कामा नये. हे तर नक्कीच. यामुळे आम्हांला स्पर्शिकेतल्या गंध ग्राहक पेशींच्या विद्युतभारात होणारा बदल मोजता येतो. त्यावरून डासाने कसला वास घेतला, ते कळतं. हे मी आता तुम्हांला दाखवणार आहे. ही आहे कीटकाची एक पेशी. मी हे बटण दाबल्याबरोबर एका सेकंदात ती प्रतिसाद देईल. त्याबरोबर त्या पेशीत काही हालचाल झाल्यासारखी वाटेल. पेशीभोवती गंध पसरला, की ती पादल्यासारखे फटाफट आवाज करेल. गंध पसरणे थांबवल्यावर ती आपल्या विराम विभवावर जाईल. (वेगाने तडतडण्याचा आवाज) (तडतडण्याचा बसका आवाज) (वेगाने तडतडण्याचा आवाज) झालं. आता तुम्ही घरी जाऊन सांगू शकता, की आज मी एका कीटकाला वास घेताना पाहिलं, आणि ऐकलंसुद्धा. विचित्र कल्पना आहे, ना? ही यंत्रणा चांगली चालते, आणि डास काय हुंगतात ते दाखवते. आता ही पद्धत आपल्या हिवतापाच्या नमुन्यांबरोबर वापरून डास काय हुंगतात, ते आम्ही शोधून काढलं. ही मुख्यत्वे हिवतापाशी संलग्न अशी अल्डिहाईड्स होती, ज्यांच्या वासाने हिवताप ओळखता येतो. अशा रीतीने आम्ही हिवतापाचा वास ओळखला, आणि डास हे जैविक संवेदक वापरून तो वास नेमका कसला, हे सिद्ध केलं. आता कल्पना करा, एखाद्या छोट्याशा डासाला लगाम घालून त्याला बाहेर न्यावं आणि एखाद्या काल्पनिक समाजातल्या लोकांना हुंगून, हिवतापाची लागण झालेले लोक त्याला शोधून काढता येतात का पाहावं. अर्थातच, हे अशक्य आहे. पण हे करू शकणारा दुसरा एक प्राणी आहे. कुत्र्याची गंध संवेदना अतिशय तीक्ष्ण असते. आणि त्यापेक्षा मोठी खासियत म्हणजे, कुत्र्याजवळ शिकण्याची क्षमता असते. आपण हे विमानतळांवर पाहिलं असेल. कुत्रे रांगेतून पुढे येत तुमचा किंवा तुमच्या सामानाचा वास घेतात. अंमली पदार्थ, स्फोटके किंवा अन्नपदार्थ शोधून काढतात. म्हणून आम्हांला वाटलं, कुत्र्यांना हिवतापाच्या वासाचं प्रशिक्षण देता येईल का? यासाठी आम्ही 'वैद्यकीय शोध श्वानपथक' नावाच्या सेवाभावी संस्थेबरोबर काम केलं. कुत्र्यांना हिवतापाचा वास शोधण्याचं प्रशिक्षण देता येतं का ते पाहण्यासाठी. आम्ही गांबिया देशात जाऊन आणखी वास गोळा केले, संसर्ग झालेल्या आणि न झालेल्या मुलांकडून. या वेळी आम्ही त्यांना मोजे घालायला लावले. नायलॉनचे पायमोजे. त्यात शरीरगंध साठवले. ते इंग्लंडला परत आणले, आणि या सेवाभावी संस्थेला प्रयोग करण्यासाठी दिले. आता मी तुम्हांला एक आलेख दाखवून त्या प्रयोगाची माहिती देऊ शकतो. पण ते जरासं कंटाळवाणं होईल, नाही का? असं म्हणतात, की मुलं आणि जिवंत प्राणी यांच्यावर प्रेक्षकांदेखत प्रयोग करू नये. पण आज आम्ही तो नियम मोडणार आहोत. आता या मंचावर फ्रेयाचं स्वागत करू.. (टाळ्या) आणि तिचे प्रशिक्षक, मार्क आणि सेरा. (टाळ्या) अर्थात, ही आजची आपली प्रमुख पाहुणी आहे. (हशा) मी तुम्हांला शांत राहण्याची विनंती करतो. हालचाल करू नका. फ्रेयासाठी हे अत्यंत अनोळखी वातावरण आहे. ती तुम्हां सर्वांना निरखून पाहते आहे. त्यामुळे आपण सर्वजण शक्य तितके शांत राहू. आता आपण फ्रेयाला या उपकरणांच्या रांगेतून पुढे जायला सांगणार आहोत. या प्रत्येक उपकरणामध्ये एक भांडं आहे. प्रत्येक भांड्यात गांबियातल्या मुलांनी वापरलेला एक पायमोजा आहे. यापैकी तीन मोजे संसर्ग न झालेल्या मुलांचे आहेत. आणि फक्त एकच मोजा संसर्ग झालेल्या मुलाचा आहे. विमानतळाप्रमाणे, इथे ही माणसं आहेत अशी कल्पना करा. आता फ्रेया रांगेतून पुढे जाऊन वास घेणार आहे. ती हिवताप कधी ओळखते, आणि ओळखते का,ते पाहू. या अनोळखी वातावरणात ही तिची मोठीच परीक्षा आहे. त्यामुळे आता मी हे मार्कच्या हातात सोपवतो. (हशा) क्रमांक तीन. ठीक. (टाळ्या) झालं. कुठलं भांडं हे मला ठाऊक नव्हतं, आणि मार्कलाही. ही खरोखरच गुप्त चाचणी होती. सेरा, उत्तर बरोबर आहे का? सेरा: हो. बरोबर उत्तर! फारच छान, फ्रेया. मस्त. वा! (टाळ्या) खरोखर, फारच सुरेख. आता सेरा भांड्यांची अदलाबदल करणार आहे. हिवतापाचा मोजा असणारं भांडं ती काढून घेणार आहे. उरलेल्या चार भांड्यांत हिवताप न झालेल्या मुलांचे मोजे असतील. म्हणजे फ्रेया कुठेही न थांबता रांगेतून पुढे गेली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. कारण संसर्ग न झालेले लोकही फ्रेयाला ओळखता आले पाहिजेत. ही कठीण परीक्षा आहे. हे मोजे गेली दोन वर्षं शीतपेटीत गोठवून ठेवले होते. आणि हे मोज्यांचे अगदी छोटे तुकडे आहेत. कल्पना करा, इथे जर खरी माणसं असती, तर किती जास्त गंध मिळाला असता. विश्वास बसत नाही, ना? ठीक आहे, मार्क, पुढे सुरु कर. (हसतात) (टाळ्या) उत्तम. सुंदर. (टाळ्या) खरोखर विलक्षण. तुमचे दोघांचे आभार. फ्रेया, मार्क आणि सेरासाठी जोरदार टाळ्या. उत्कृष्ठ कामगिरी. (टाळ्या) किती हुशार कुत्री. लवकरच तिला बक्षीस मिळणार आहे. सुरेख. आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंत. हे खरोखरचं प्रात्यक्षिक होतं. मला धाकधूक वाटत होती. पण सर्व ठीक झालं. छान. (हशा) हे खरोखर विश्वास न बसण्यासारखंच आहे. हे कुत्रे जेव्हा हिवतापाचा संसर्ग असल्याचं ओळखतात, त्यापैकी ८१% वेळा तो अचूक असतो. यावर विश्वास बसत नाही. आणि ९२% वेळा संसर्ग नसल्याचं निदान बरोबर असतं. रोगलक्षण सूचकांसाठी जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या टक्केवारीपेक्षा हे प्रमाण मोठं आहे. आता आम्ही देशादेशांतून असे कुत्रे तैनात करण्याचा विचार करत आहोत. विशेषतः देशप्रवेशाच्या ठिकाणी. देशात येणाऱ्यांचा हिवताप संसर्ग ओळखण्यासाठी. हे खरंच घडू शकेल. पण सगळीकडे कुत्रे ठेवणं शक्य नाही. म्हणून सध्या आम्ही तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत आहोत. अंगावर चढवण्यासारखं तंत्रज्ञान, ज्यामुळे स्वयंनिदान करता येईल. त्वचेवर लावण्यासारखा एक पॅच. घामात हिवतापाचा संसर्ग आढळला, की त्याचा रंग बदलेल. किंवा याहून थोडं जास्त तंत्रज्ञान.. हिवताप आढळला की इशारा देणारं स्मार्ट घड्याळ. याद्वारे आपण माहिती जमवू शकलो, तर कल्पना करा, जगभरातून किती आकडेवारी गोळा होईल. यामुळे, रोगप्रसार कसा होतो ते शोधण्याच्या पद्धतीत आमूलाग्र क्रांती होईल. रोगाच्या साथी रोखण्याच्या प्रयत्नांची दिशा बदलेल. हिवताप निर्मूलन होईल. किंवा त्यापुढे जाऊन, ज्यांचा गंध ओळखता येतो, अशा सर्व रोगांचंही. या रोगांचे गंध ओळखण्याची निसर्गात असलेली शक्ती वापरून आपण हे करू शकतो. नव्या कल्पना, नवे विचार, नवं तंत्रज्ञान शोधून जगातले मोठमोठे प्रश्न सोडवणं हे आम्हां संशोधकांचं कामच आहे. पण मला सतत एका गोष्टीचं नवल वाटतं, की बरेचदा निसर्गाने हे काम आधीच करून ठेवलेलं असतं. आणि ते उत्तर अगदी आपल्या नाकासमोर असतं. धन्यवाद. (टाळ्या)