-
タイトル:
चिंताविकाराशी सामना कसा करावा - ऑलिव्हिया रेमेस
-
概説:
चिंताविकार हा सर्वत्र आढळणाऱ्या मानसिक विकारांपैकी एक आहे. जगभरात प्रत्येक १४ व्यक्तींमागे एका व्यक्तीला चिंताविकार असण्याची शक्यता असते. या विकाराच्या तीव्रतेनुसार नैराश्य किंवा आत्महत्येचा धोका उद्भवतो. मानसिक दुर्बलता आणि त्यासाठीच्या उपचारांची निकड वाढते. पण प्रत्यक्षात हे उपचार फार थोड्या लोकांना मिळतात. चिंताविकाराशी सामना करण्याचं मर्म उलगडून सांगताहेत, केम्ब्रिज विद्यापीठाच्या ऑलिव्हिया रेमेस. त्या म्हणतात, "यावर मानसिक उपचार किंवा औषधोपचार उपलब्ध असले, तरी फारसे उपयोगी पडत नाहीत. या उपचारांनंतर चिंताविकार उलटून पुन्हा सुरु होण्याचं प्रमाण मोठं आहे. त्याऐवजी आपण स्वतःची मानसिक ताकद वाढवली पाहिजे. समस्या सोडवण्याची पद्धत बदलली पाहिजे. आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमागचा अर्थ समजून घेऊन त्यांचा सामना करणं आपल्या आवाक्यात आहे, असा विश्वास बाळगला, तर चिंताविकार जडण्याची शक्यता बरीचशी कमी होते."
-
असं समजा, की तुम्ही समारंभाला जाण्यासाठी
तयारी करत आहात.
-
तुम्हाला उत्साह वाटतो आहे,
तशीच थोडीशी चिंताही वाटते आहे.
-
पोटात गोळा आला आहे धाकधूक वाटते आहे.
-
हृदयाच्या धडधडीसारखी.
-
तुमचं मन तुम्हांला मागे खेचतं आहे.
-
"थांब. इतका आनंद वाटू देऊ नकोस.
-
जरा सावध रहा, काहीतरी विपरीत घडू शकतं."
-
तुम्हांला प्रश्न पडतो,
"समारंभात मी कोणाशी बोलू?
-
माझ्याशी कोणी बोललं नाही तर?
लोक मला विक्षिप्त समजले तर?"
-
तुम्ही समारंभात पोहोचता.
-
कोणीतरी तुमच्याजवळ येतं
आणि तुमच्याशी बोलू लागतं.
-
आणि त्याचवेळी
-
तुमचं मन सैरभैर होतं.
हृदयाचे ठोके वाढतात.
-
तुम्हांला घाम फुटतो.
-
आपण स्वतःपासून विलग झालो आहोत,
असं वाटू लागतं.
-
जणु तुम्ही तुमच्या शरीरात नसून,
बाहेरून स्वतःलाच बोलताना पाहत आहात.
-
"भानावर ये." तुम्ही स्वतःला सांगता,
पण तसं करू शकत नाही.
-
चिंतेची तीव्रता वाढत जाते.
-
काही क्षण बोलून झाल्यावर
-
ती व्यक्ती निघून जाते.
-
आता तुम्हांला पूर्णपणे
पराभव झाल्यासारखं वाटू लागतं.
-
बऱ्याच काळापासून, समाजात मिसळताना
तुम्हाला असेच अनुभव येताहेत.
-
किंवा कल्पना करा, की
आपण गर्दीच्या ठिकाणी आहोत.
-
तुम्हाला भीती वाटू लागते.
-
आजूबाजूला पुष्कळ लोक असणाऱ्या ठिकाणी,
-
उदाहरणार्थ, बसमध्ये
तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं.
-
ते टाळण्यासाठी तुम्ही
बाहेर जाणं टाळता.
-
मग त्यामुळे एकटेपणा जाणवतो.
-
या दोन्ही उदाहरणांतील व्यक्तींना
-
चिंताविकार जडला आहे.
-
आपल्या समजुतीपेक्षा कितीतरी जास्त लोकांना
-
चिंताविकार जडलेला असतो.
-
आजमितीला, जगात दर १४ व्यक्तींमागे
-
एका व्यक्तीला हा विकार आहे.
-
दरवर्षी, या विकारावरच्या उपचारांसाठी
-
४२ दशकोटी डॉलर्सहूनही जास्त खर्च होतो.
-
चिंताविकारामुळे आयुष्यावर
काय परिणाम होऊ शकतात
-
ते सांगते..
-
नैराश्य, शिक्षण सोडून देणे,
आत्महत्येचे विचार मनात येणे.
-
या विकारामुळे ध्येयाकडे वाटचाल करणं,
आणि नोकरी टिकवणं कठीण जातं.
-
नातेसंबंध तुटू शकतात.
-
हे अनेक लोकांना ठाऊक नसतं.
-
त्यामुळे ते हा विकार दडवून ठेवतात.
-
ही एक प्रकारची भीती आहे, आणि त्यावर
मात करणं शक्य आहे असं मानलं जातं.
-
पण या विकारात भीतीहूनही जास्त
असं काहीतरी असतं.
-
हा विकार फारसा महत्त्वाचा मानला जात नाही,
-
कारण त्याचं नेमकं स्वरूप
लोकांना ठाऊक नसतं.
-
हा स्वभावाचा भाग आहे का? आजार आहे का?
की नैसर्गिक भावना? काय आहे हे?
-
म्हणूनच, सर्वसाधारण चिंता आणि चिंताविकार
-
यातला फरक जाणणं महत्त्वाचं आहे.
-
सर्वसाधारण चिंता ही एक सामान्य भावना आहे.
-
तणावाच्या परिस्थितीत
अशी चिंता वाटणं साहजिक आहे.
-
उदाहरणार्थ, कल्पना करा, की
तुम्ही जंगलात आहात,
-
आणि तुमच्यासमोर एक अस्वल आलं.
-
यामुळे कदाचित तुम्हांला थोडी चिंता वाटेल.
-
तिथून पळून जावंसं वाटेल.
-
या प्रकारची चिंता वाटणं चांगलंच,
कारण त्यामुळे तुमचा जीव वाचेल.
-
तुम्ही ताबडतोब तिथून पळून जाल.
-
तसं पाहिलं तर अस्वल पाहून पळत सुटणं
ही काही तितकीशी चांगली कल्पना नाही.
-
अस्वलापेक्षा जलद कोणी पळू शकेल,
असं मला वाटत नाही.
-
नोकरीच्या ठिकाणी,
चिंतेमुळे आपण दिलेल्या मुदतीत कामं करतो,
-
आयुष्यात येणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगांचा
सामना करतो.
-
पण कधीकधी ही चिंतेची भावना
पराकोटीला पोहोचते.
-
ज्या घटनांपासून खराखुरा धोका उद्भवत नाही,
त्याही वेळी ती निर्माण होते.
-
अशावेळी हा चिंताविकार असू शकतो.
-
उदाहरणार्थ, सार्वत्रिक चिंताविकार.
(Generalized Anxiety Disorder)
-
या विकारात सतत सर्व गोष्टींबद्दल
पराकोटीची चिंता वाटते.
-
ही चिंता आटोक्यात ठेवणं कठीण जातं.
-
याबरोबर भीती, अस्वस्थता
अशी लक्षणंसुद्धा जाणवतात.
-
रात्री झोप लागत नाही.
कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही.
-
चिंता, मग ती कोणत्याही प्रकारची असो,
-
तिची तीव्रता कमी करण्यासाठी
उपाय उपलब्ध आहेत.
-
ते उपयुक्त आहेत,
आणि अतिशय सोपे आहेत.
-
बरेचदा, मानसिक विकारांसाठी
औषधं दिली जातात.
-
पण ती दीर्घकाळ उपयोगी पडत नाहीत.
-
कालांतराने लक्षणं पुन्हा दिसू लागतात,
आणि विकार पुन्हा पहिल्या अवस्थेत जातो.
-
म्ह्णून हा एक वेगळा विचार
करून पाहण्यासारखा आहे.
-
आपण समस्यांना कशा प्रकारे तोंड देतो,
-
त्यावर आपल्या चिंतेचं प्रमाण
अवलंबून असतं.
-
समस्या हाताळण्याची पद्धत जराशी बदलली,
तर चिंतेचं प्रमाण कमी होऊ शकतं.
-
केम्ब्रिज विद्यापीठातल्या
आमच्या पाहणीनुसार,
-
गरीब वस्तीतल्या स्त्रियांना
चिंताविकार होण्याची शक्यता
-
सधन वस्तीतल्या स्त्रियांपेक्षा
जास्त असते.
-
हा निष्कर्ष तसा धक्कादायक वाटला नाही.
पण सखोल अभ्यासातून निराळं काही जाणवलं.
-
गरीब वस्तीतल्या स्त्रियांना
-
समस्या सोडवण्याची एक खास पद्धत ठाऊक असेल,
-
तर त्यांना चिंतेचा त्रास होत नाही.
-
पण ती पद्धत ठाऊक नसेल, तर त्यांना
-
चिंताविकार सतावतो.
-
इतर काही पाहण्यांनुसार,
-
ज्या लोकांना ही पद्धत ठाऊक होती,
-
त्यांचं मानसिक आरोग्य
-
युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या
-
खडतर परिस्थितीतसुद्धा उत्तम राहिलं.
-
पण ज्यांना ही पद्धत ठाऊक नव्हती,
-
त्यांना याच खडतर परिस्थितीमुळे
मानसिक विकार जडले.
-
तर मग, काय आहेत या
समस्या हाताळण्याच्या पद्धती?
-
त्यांचा वापर करून चिंताविकाराची तीव्रता
कमी कशी करता येईल?
-
त्याबद्दल सांगण्याअगोदर,
-
एक रोचक गोष्ट सांगते.
-
या पद्धती तुम्ही स्वतःच तयार करू शकता.
-
तुमच्या स्वतःच्या वागण्यातून.
-
तुमच्या चिंताविकारावर ताबा मिळवून
त्याची तीव्रता कमी करू शकता.
-
स्वतःला सक्षम करणारी ही गोष्ट आहे.
-
आज मी अशा प्रकारच्या
तीन पद्धतींविषयी बोलणार आहे.
-
पहिली, आपल्या आयुष्यावर
आपलं नियंत्रण आहे, असे समजणे.
-
आपलं आयुष्य आपल्या नियंत्रणाखाली आहे
असं समजणाऱ्या लोकांचं
-
मानसिक आरोग्य चांगलं असतं.
-
तसं तुम्हांला वाटत नसेल, तर
-
नियंत्रणात असलेल्या गोष्टी करून
-
तो अनुभव घ्यावा,
असं संशोधन सांगतं.
-
माझं म्हणणं स्पष्ट करून सांगते.
-
अजून पूर्ण तयारी झाली नाही, अशा समजुतीने
-
तुम्ही एखादं काम सुरु करणं
लांबणीवर टाकता का?
-
आज कोणते कपडे घालावेत?
कोणाबरोबर डेटला जावं?
-
कोणती नोकरी घ्यावी?
असे निर्णय तुम्हांला कठीण वाटतात का?
-
काय करावं हा निर्णय घेण्यात
तुमचा इतका वेळ वाया जातो,
-
की तुम्ही काहीच करू शकत नाही?
-
अनिर्णायक अवस्था, नियंत्रणाबाहेरची
परिस्थिती, यावर उपाय म्हणजे
-
ती गोष्ट चुकीची का होईना, पण करणे.
-
जी. के. चेस्टरटन हे एक कवी आणि लेखक आहेत.
ते म्हणतात,
-
जी गोष्ट करण्यासारखी असेल, ती पहिल्या वेळी
चुकीच्या पद्धतीने करायला हरकत नाही.
-
ही युक्ती चांगली लागू पडते,
कारण यामुळे
-
अनिर्णायक अवस्था संपते, आणि तुम्ही
कृतीच्या अवस्थेत ढकलले जाता.
-
नाहीतर काय करावं, कसं करावं,
-
या विचारात
-
तासनतास फुकट जाऊ शकतात,
-
तुमची शक्ती नष्ट होते, आणि
ते काम सुरु करण्याची भीती वाटू लागते.
-
बरेचदा, आपल्याला बिनचूक काम करायचं असतं.
पण आपण काहीच करू शकत नाही.
-
कारण आपण स्वतःसमोर
इतके उच्च आदर्श ठेवतो, की
-
त्यांचीच आपल्याला भीती वाटते.
-
या तणावामुळे आपण काम पुढे ढकलत राहतो,
-
किंवा करतच नाही.
-
चुकीच्या पद्धतीने करण्याची मुभा मिळाल्यावर
कृती मोकळेपणाने घडते.
-
तुम्हांला हे ठाऊक आहे.
-
अनेकदा, काम बिनचूक हवं, या भीतीपोटी
आपण ते सुरूच करत नाही.
-
योग्य वेळी करू, योग्य क्षमता आली की करू,
असं म्हणतो.
-
यामुळे ताण तणाव निर्माण होऊ शकतात.
-
त्यापेक्षा त्या कामात झटकन उडी घेऊन
ते करूनच टाकलं तर?
-
ते चांगलं होतंय की नाही,
याची चिंता कशाला?
-
या विचारामुळे काम सुरु करणं सोपं जातं.
-
मग चुकीच्या पद्धतीने का होईना,
ते करून संपतं.
-
नंतर मागे वळून पाहताना
-
आपल्या लक्षात येतं, की
ते काही तितकंसं चुकीचं नव्हतं.
-
माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला
चिंताविकार आहे.
-
तिने हा मंत्र वापरायला सुरुवात केली आहे.
-
ती म्हणते, "या मंत्रामुळे
माझं आयुष्य बदलून गेलं.
-
आता मी पूर्वीपेक्षा कमी वेळात कामं उरकते.
-
चुकीची मुभा असल्यामुळे मी
धोका पत्करते, काही वेगळं करून पाहते.
-
या वेगळ्या पद्धतीमुळे कामातली मजा अनुभवते.
-
या मंत्रामुळे चिंतेची जागा
उत्साहाने घेतली आहे. "
-
चुकीच्या पद्धतीने काम करा, आणि
करता करता कामात सुधारणा करा.
-
आता यावर विचार करा पाहू..
-
आजपासून तुम्ही हा मंत्र वापरला,
तर तुमच्या आयुष्यात काय बदल घडेल?
-
चिंताविकाराचा सामना करण्याचं दुसरं धोरण,
स्वतःला क्षमा करणे.
-
हे फार प्रभावी आहे.
-
चिंताग्रस्त लोक आपल्या चुका,
काळज्या, दुःखभावना
-
याबद्दल अति विचार करतात.
-
समजा, तुमचा एक मित्र
सतत तुमच्या चुका शोधून काढून
-
त्या तुम्हांला सांगतो आहे.
-
तुमच्या आयुष्यात जे जे काही
वाईट घडलं असेल, ते सर्व.
-
या माणसाला
-
ताबडतोब हाकलून द्यावं,
असं तुम्हांला वाटेल, हो ना?
-
चिंताग्रस्त लोक दिवसभर स्वतःलाच
हा त्रास देत असतात.
-
ते स्वतःशी फारसे चांगुलपणाने वागत नाहीत.
-
तर आता, स्वतःशी जरा दयाळूपणे वागून पहा.
-
स्वतःच स्वतःचा आधार व्हा.
-
हे कसं करायचं?
स्वतःच्या चुकांबद्दल
-
स्वतःला क्षमा करायची.
-
मग त्या अगदी नुकत्याच केलेल्या चुका असोत,
-
किंवा भूतकाळातल्या.
-
पूर्वी कधीतरी भीतीने ग्रस्त झाल्याची
शरम वाटत असेल,
-
तर त्याबद्दल स्वतःला क्षमा करा.
-
तुम्हांला कोणाशी तरी बोलावंसं वाटलं असेल,
-
पण तसा धीर झाला नसेल,
-
तर चिंता करू नका, स्वतःला क्षमा करा.
-
या सगळ्या गोष्टींबद्दल
स्वतःला क्षमा करा.
-
मग तुम्हांला स्वतःविषयी
जरा जास्त करुणा वाटेल.
-
हे केल्याशिवाय तुमच्या मनाच्या जखमा
भरून येणार नाहीत.
-
आता शेवटची, पण महत्त्वाची गोष्ट.
-
आपल्या आयुष्याला
-
काहीतरी हेतू किंवा अर्थ असणं.
-
आपण आयुष्यात कोणतंही काम केलं,
-
कितीही पैसा कमावला,
-
तरीही कोणालातरी आपण हवे आहोत,
या भावनेशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही.
-
आपल्या कृतीमुळे कोणाचं तरी भलं व्हावं,
-
किंवा आपल्या प्रेमाचा कोणाला तरी
आधार वाटावा.
-
म्हणजे,
-
कोणीतरी आपली स्तुती केली तर आपण सुखी होऊ,
असं नव्हे.
-
याचा अर्थ असा, की आपण दुसऱ्यांसाठी
कधीच काही केलं नाही,
-
तर मानसिक आरोग्य
ढासळण्याची शक्यता असते.
-
सुप्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट
डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल म्हणतात,
-
"ज्यासाठी जगावं, असं काही उरलं नाही, किंवा
-
आयुष्याकडून कसलीच अपेक्षा शिल्लक नाही,
-
असं म्हणणाऱ्या व्यक्तींना समजवायला हवं,
-
की तुम्ही जिवंत आहात, म्हणजे अजून
तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. "
-
इतर कोणाच्या हितासाठी केलेली कृती
आपल्याला कठीण समयी तारून नेते.
-
जगायचं कशासाठी,
हे त्यातून आपल्याला समजतं,
-
आणि मग आपण कोणत्याही परिस्थितीचा
सामना करू शकतो. कोणत्याही.
-
आता प्रश्न असा, की
-
केवळ दुसऱ्यासाठी अशी
एक तरी कृती तुम्ही करता का?
-
मग ते विनावेतन काम असेल,
-
किंवा आज, इथे मिळालेलं हे ज्ञान
इतरांना सांगणं असेल.
-
खासकरून ज्यांना गरज असेल, त्यांना.
-
आणि अशाच लोकांजवळ समुपदेशन घेण्यासाठी
पैसे नसतात.
-
आणि साधारणपणे अशाच लोकांमध्ये
-
चिंताविकार मोठ्या संख्येने आढळतो.
-
हे ज्ञान त्यांना द्या, सर्वांना द्या.
-
कारण त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य
खरोखर सुधारेल.
-
आता आणखी एक विचार सांगून हे भाषण संपवते.
-
इतरांच्या भल्यासाठी काहीतरी करण्याचा
आणखी एक मार्ग म्हणजे
-
पुढच्या पिढयांना ज्याचा उपयोग होईल,
असं काही कार्य करणे.
-
तुमचं हे कार्य त्यांना समजलं नाही,
-
तरी हरकत नाही.
-
कारण तुमचं कार्य तुम्हांला ठाऊक असेल.
त्यामुळे तुमच्या लक्षात येईल,
-
की या बाबतीत आपण एकमेव आहोत,
आणि हेच आपल्या आयुष्याचं महत्त्व आहे.
-
धन्यवाद.
-
(टाळ्या)