ख्रिस अँडरसन: डॉ. जेन गुडाल, आपले स्वागत. जेन गुडाल: धन्यवाद. मला वाटतं, माझ्यासोबत मि. एच आहेत, हे लोकांना कळले पाहिजे. नाहीतर ही मुलाखत अपुरी राहील. कारण मि. एच यांना सगळे ओळखतात. ख्रिस: हॅलो, मि. एच. १७ वर्षांपूर्वीच्या टेड व्याख्यानात आपण मानवाच्या निसर्गावरच्या अतिक्रमणाबद्दल धोक्याची सूचना दिली होती. आजची ही महामारी म्हणजे एक प्रकारे निसर्गाचा प्रतिहल्ला आहे, असे आपल्याला वाटते का? गुडाल:हे अगदी स्पष्ट आहे, की करोना किंवा एच आय व्ही/एड्स यासारखे प्राणिजन्य रोग आणि प्राण्यांपासून उद्भवणारे सर्व प्रकारचे इतर रोग यांचा पर्यावरणाच्या हानीशी अंशतः संबंध आहे. प्राण्यांचे निवासस्थान नष्ट झाले, की ते दाटीवाटीने राहू लागतात. त्यामुळे काहीवेळा एखाद्या प्राणी प्रजातीत सामान्यपणे आढळणारा विषाणू, जो शेकडो वर्षे त्या प्रजातीत सहजपणे राहिला असेल, तो नव्या प्रजातीत संक्रमित होतो. याशिवाय, प्राणी मानवाच्या अधिक निकट संपर्कात येत आहेत. काहीवेळा यापैकी एखादा प्राणी -- ज्याला विषाणूची लागण झाली असेल -- तो विषाणूला मानवात संक्रमित होण्याची संधी देतो, आणि कोविड-१९ सारखा नवा रोग निर्माण करतो. याचबरोबर आपण प्राण्यांचा मोठा अनादर करत आहोत. आपण त्यांची शिकार करतो, त्यांना ठार मारतो, त्यांना खातो, त्यांचा विक्रय करतो, वन्यप्राण्यांच्या बाजारपेठेत पाठवतो, आशियामध्ये. तिथे त्यांना छोट्याशा पिंजऱ्यांत, भयानक अवस्थेत कोंडून ठेवले जाते. तिथे मानवांमध्ये रक्त, मूत्र, विष्ठा याद्वारे संसर्ग फैलावतो. एका प्राण्यातून दुसऱ्यात किंवा मानवात विषाणूचा प्रसार होण्यासाठी ही परिस्थिती आदर्श ठरते. ख्रिस: मला थोडं भूतकाळात डोकावायचे आहे. कारण आपली कहाणीच तशी अद्भुत आहे. म्हणजे १९६० च्या सुमारास, आजच्यापेक्षा कट्टर स्त्रीविरोधी वातावरणात आपण मार्ग काढू शकलात, जगातल्या आघाडीच्या शास्त्रज्ञांपैकी एक ठरलात, चिंपांझींबद्दल एकामागून एक आश्चर्यजनक शोध लावलेत, म्हणजे त्यांनी साधनांचा केलेला वापर, आणि असेच इतर अनेक शोध. हे यश आपल्यामधल्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे मिळाले, असे आपल्याला वाटते? गुडाल: प्राण्यांविषयी प्रेम घेऊनच मी जन्माला आले. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आईने मला खूप पाठिंबा दिला. माझ्या अंथरुणात गांडूळ पाहून ती चिडली नाही. हे बागेत असायला हवेत, इतकेच म्हणाली. मी चार तास गायब होते, तेव्हाही ती चिडली नाही. तिने पोलिसांना फोन केला. मी खुराड्यात बसून राहिले होते. कारण अंडे कोणत्या भोकातून बाहेर येते ते मला कोणी सांगत नव्हते. शास्त्रज्ञ व्हावे,असे माझे स्वप्न नव्हते. कारण स्त्रिया अशा प्रकारचे काही करत नसत. खरे तर त्याकाळी कोणी पुरुषही असे काही करत नव्हते. सगळे मला हसले. फक्त आई सोडून. ती म्हणाली, "तुला हे खरोखर करायचे असेल, तर प्रचंड कष्ट करावे लागतील. प्रत्येक संधीचा फायदा घ्यावा लागेल. हार मानली नाहीस, तर कदाचित तुला मार्ग सापडेल." ख्रिस: आणि कसा कोण जाणे, आपण चिंपांझींचा विश्वास संपादन केलात. हे पूर्वी कोणालाच जमले नव्हते. मागे वळून पाहताना आनंदाचे कोणते क्षण आठवतात? किंवा अजून चिंपांझींबद्दल लोकांना न कळणारे असे काही आहे का? गुडाल: तुम्ही म्हणता, "कोणीच न पाहिलेले मी पाहिले, विश्वास संपादन केला." इतर कोणी प्रयत्नच केला नव्हता. खरंच सांगते. मी त्याच पद्धती वापरल्या, ज्या वापरून मी लहानपणी घराभोवतीच्या प्राण्यांचा अभ्यास करत असे. शांतपणे बसून राहणे. भर्रकन प्राण्यांच्या फार जवळ न जाणे. पण ते कठीण होते. कारण फक्त सहा महिन्यांपुरते पैसे होते. कल्पना करा, पैसे मिळवणे किती कठीण असेल. एका तरुण मुलीला, जिच्याजवळ पदवीही नाही, काहीतरी विचित्र करण्यासाठी, जंगलात जाऊन शांत बसून राहण्यासाठी पैसे. पण शेवटी एका अमेरिकन परोपकारी व्यक्तीकडून सहा महिन्यांपुरते पैसे मिळाले. कालांतराने आपण चिंपांझीचा विश्वास कमावू, हे मला ठाऊक होते. पण माझ्याजवळ वेळ होता का? हळूहळू महिने उलटले, आणि शेवटी सुमारे चार महिन्यांनंतर एका चिंपांझीची भीती चेपली. आणि एका प्रसंगी त्याच चिंपांझीला मी पाहिले -- अजून मी फार जवळ गेले नव्हते, पण माझ्याजवळ दुर्बीण होती -- वाळवी शोधण्यासाठी साधने तयार करून तो ती वापरत होता. मला आश्चर्याचा धक्का बसला नाही, कारण बंदिवासातील चिंपांझी काय करू शकतात ते मी वाचले होते -- पण मला वैज्ञानिक मत ठाऊक होते. ते असे, की मानव, फक्त मानवच साधने निर्माण करतो आणि त्यांचा वापर करतो. [डॉ. लुईस] लीकींना किती आनंद होईल, ते मला ठाऊक होते. या निरीक्षणामुळे त्यांना नॅशनल जॉग्राफिककडे जाता आले. आणि त्यांचे उत्तर आले, "ठीक आहे, आम्ही या संशोधनासाठी साहाय्य करत राहू." मग त्यांनी ह्युगो व्हान लाविक या छायाचित्रकार-चित्रपटनिर्मात्याला पाठवले. माझ्या निरीक्षणाची नोंद करण्यासाठी. अनेक शास्त्रज्ञ साधन वापरावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. खरेच, त्यातला एक म्हणाला, की मी चिंपांझींना शिकवले असले पाहिजे. (हशा) पण मी त्यांच्याजवळ जात नव्हते, म्हणजे हा चमत्कार असावा. पण ह्युगोची चित्रफीत पाहिल्यावर, आणि मी केलेली चिंपांझींच्या वर्तनाची वर्णने ऐकल्यावर शास्त्रज्ञांना आपले मत बदलायला सुरुवात करावी लागली. ख्रिस: आणि त्यानंतर आपण आणखी अनेक शोध लावलेत. त्यामुळे चिंपांझींचे मानवाशी अविश्वसनीय असे जवळचे नाते सिद्ध झाले. चिंपांझींना विनोदाचे अंग असते असे तुम्ही कुठेतरी म्हटल्याचे आठवते. ते कुठे व्यक्त झालेले आपण पाहिले आहे का? गुडाल: त्यांच्या खेळात ते दिसून येते. एखादा मोठा चिंपांझी छोट्याशी खेळत असतो. छोटा झाडाभोवती वेलीमागे जात असतो. दरवेळी छोटा ती वेल पकडणार, तेवढ्यात मोठा ती ओढून दूर खेचतो. छोटा रडू लागतो, तर मोठा हसू लागतो. यावरून समजते. ख्रिस: आणि नंतर आपण फार क्लेशकारक असे काही पाहिलेत. काही प्रसंगी आपण चिंपांझींच्या टोळ्या, जमाती, गट, एकमेकांशी क्रूरपणे, हिंसकपणे वागताना पाहिलेत. याचा अर्थ आपण कसा लावला हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यांना पाहून आपल्याला मानवाबद्दल निराशा वाटली का? कारण मानवाशी त्यांचे जवळचे नाते आहे. सर्व वानर जमातींमध्ये अटळपणे कोणत्या तरी स्वरूपात हिंसा असणार, असे वाटले का? गुडाल: तशी ती आहे, हे तर उघड आहे. मानवी क्रौर्याशी माझा प्रथम संबंध आला, तो युद्ध संपल्यावर, ज्यूंच्या संहाराची चित्रे पाहताना. आणि त्यामुळे मला मोठा धक्का बसला. त्यामुळे मी बदलले. मला वाटतं, त्यावेळी मी दहा वर्षांची होते. आणि जेव्हा मला चिंपांझींमधल्या हिंसेची झलक दिसली, तेव्हा वाटलं, की ते आपल्यासारखेच पण जास्त चांगले आहेत. मग समजले, की माझ्या कल्पनेपेक्षा आपल्यात जास्त साम्य आहे. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला हे फार विचित्र वाटले. आक्रमकता ही जन्मजात असते, की आत्मसात केलेली असते याबद्दल मोठा वाद होता. आणि त्याला राजकीय वळण लागले. तो खराच मोठा विचित्र काळ होता. मी पुढे सरून सांगत होते, "नाही. मला वाटते, आक्रमकता हा नक्कीच आपल्या नैसर्गिक वर्तणुकींच्या पटलामधला एक भाग आहे." एका आदरणीय शास्त्रज्ञाला मी त्यांचे खरेखुरे मत विचारले. कारण ते स्पष्ट सांगत होते, की आक्रमकता आत्मसात केलेली असते. आणि ते म्हणाले, "जेन, मला खरोखर काय वाटते याबद्दल मी न बोलणे चांगले." माझ्यासाठी विज्ञानाच्या दृष्टीने हा मोठाच धक्का होता. ख्रिस: लहानपणापासून, जग सुंदर आहे असा माझा समज होता. फुलपाखरे, मधमाशा, फुले यांबद्दलचे अनेक सुंदर चित्रपट, अतिशय सुंदर असे निसर्गचित्र. अनेक पर्यावरण शास्त्रज्ञ बरेचदा असा पवित्रा घेतात, "होय, निसर्ग निर्मळ आहे. निसर्ग सुंदर आहे. मानव दुष्ट आहे." पण प्रत्यक्षात मात्र आपली निरीक्षणे निराळी असतात. निसर्गाच्या कोणत्याही घटकाकडे जास्त बारकाईने पाहता खरोखर भयंकर गोष्टी आढळतात. निसर्गाचा अर्थ आपण कसा लावता? आपल्याला काय वाटते? आपण त्याचा अर्थ कसा लावावा? गुडाल: निसर्ग म्हणजे उत्क्रांतीचा संपूर्ण वर्णपट पाहता, एखादे आदिम स्वरूपातले ठिकाण.. माझ्या लहानपणी आफ्रिका अशी आदिम स्वरूपात होती. तिथे सर्वत्र प्राणी होते. आणि सिंहांनी शिकार केलेली मला कधीच आवडत नसे. पण त्यांना शिकार करावी लागते. तो त्यांचा धर्म आहे. त्यांनी प्राणी मारले नाहीत, तर ते स्वतः मरतील. आपण आणि प्राणी यांतला मोठा फरक, मला वाटते, ते जे काही करतात, तो त्यांचा धर्म असतो म्हणून करतात. आपण योजना आखून काम करू शकतो. आपल्या योजना फार निराळ्या असतात. आपण एखादे जंगल पूर्णपणे तोडण्याच्या योजना आखू शकतो, कारण आपल्याला लाकूड विकायचे असते, किंवा आणखी एखादा शॉपिंग मॉल बांधायचा असतो, वगैरे काहीतरी. आपण निसर्गाचा नाश करतो, युद्धे करतो. आपण असा दुष्टावा करू शकतो, कारण स्वतः आरामात बसून आपण दूरवर कोणाला तरी छळण्याची योजना आखू शकतो. हा दुष्टपणा आहे. चिंपांझींचे युद्ध आदिम प्रकारचे असते. ते अतिशय आक्रमक होऊ शकतात. पण ते क्षणिक असते. ती त्यांची भावना असते. एका भावनेला दिलेला तो प्रतिसाद असतो. ख्रिस: आपल्या निरीक्षणानुसार चिंपांझींची प्रगती काही लोक ज्याला मानवी महाशक्ती म्हणतात तिच्याइतकी नाही. भविष्याचे तपशीलवार चित्र मनात पाहून मानव दीर्घकालीन योजना आखू शकतो. त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. चिंपांझींबरोबर इतका काळ घालवलेल्या आपणासारख्या व्यक्तीलादेखील असे वाटते की हे निराळे कौशल्य आहे. आपण त्याची जबाबदारी घेऊन ते अधिक शहाणपणाने वापरले पाहिजे. गुडाल: होय. मला स्वतःला असे वाटते -- म्हणजे याबद्दल बरीच चर्चा झाली आहे, पण मला वाटते, आपण दोघे ज्या पद्धतीने संवाद करत आहोत, ती पद्धत मानवाने निर्माण केली आहे. आपल्याजवळ शब्द आहेत. म्हणजे प्राण्यांमधला संवाद आपल्याला वाटतो त्यापेक्षा फार प्रगत आहे. चिंपांझी, गोरिला, ओरँगउटान हे बहिऱ्यांसाठीची मानवी खाणाखुणांची भाषा शिकू शकतात. आपली जी भाषा असेल, तीच शिकत आपण मोठे होतो. त्यामुळे तुम्ही कधीच ऐकल्या नसतील अशा गोष्टी मी तुम्हांला सांगू शकते. पण चिंपांझी तसे करू शकत नाहीत. आपण आपल्या मुलांना अमूर्त गोष्टी शिकवू शकतो. पण चिंपांझी तसे करू शकत नाहीत. हो, चिंपांझी सर्व प्रकारच्या चतुराईच्या गोष्टी करू शकतात. तसेच हत्ती, कावळे आणि ऑक्टोपससुद्धा करू शकतात. पण आपण दुसऱ्या ग्रहांवर जाणारी याने तयार करू शकतो. छायाचित्रे काढणारे छोटे यंत्रमानव निर्माण करू शकतो. आपण दोघे आपापल्या ठिकाणाहून एकमेकांशी बोलतो आहोत, ती अद्भुत पद्धत आपण शोधून काढली आहे. माझ्या लहानपणी टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. संगणक नव्हते. ते जग फार निराळे होते. माझ्याजवळ होती फक्त पेन्सिल, पेन आणि वही. ख्रिस: आपण पुन्हा निसर्गाबद्दलच्या प्रश्नाकडे वळू. मी याबद्दल पुष्कळ विचार करतो. प्रामाणिकपणे सांगतो, मी हे समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आपण, आणि मला आदरणीय असणाऱ्या अनेक लोकांनी निसर्गाची हानी होऊ न देणे या एका ध्यासापोटी इतके कार्य केले आहे. तर, ही गोष्ट शक्य आहे का, योग्य किंवा गरजेची आहे का: आपण एकाच वेळी दोन्ही बाजू स्वीकारू शकतो का, की निसर्गात अनेक भयंकर गोष्टी असतात, पण त्याचवेळी निसर्ग विलक्षण सुंदरही असतो. यापैकी काही सौंदर्य त्या भयंकरपणाच्या शक्यतेतून निर्माण होतं. ते आपले भान हरपण्याइतके सुंदर असते. आपण निसर्गाचा एक भाग आहोत. त्याशिवाय आपल्याला अस्तित्व नाही. मानवाला पूर्णत्व हवे असेल, तर प्रथम आपण निसर्गाला आपलेसे केले पाहिजे. त्याचा भाग झाले पाहिजे. बरोबर? हे नाते कोणत्या भाषेत मांडावे? आपण मला मार्गदर्शन करा. गुडाल: मला वाटतं, एक समस्या अशी आहे, की आपली बुद्धी जशी विकसित झाली, तशी आपल्या उपयोगासाठी पर्यावरणात बदल घडवण्याची आपली क्षमता वाढत गेली, आपण शेती करून पीक घेऊ लागलो. त्या जागी पूर्वी जंगल किंवा वनराई होती. आपण आता त्याबद्दल बोलायला नको. पण अशी आहे आपली निसर्ग बदलण्याची क्षमता. आपण शहरांत आणि महानगरांत जास्त वस्ती करू लागलो, तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहू लागलो, त्यामुळे जास्त लोकांना निसर्गापासून ताटातूट झाल्यासारखे वाटू लागले. आज शेकडो, हजारो मुले शहराच्या आतल्या भागांत वाढताहेत. तिथे कोणत्याही प्रकारचा निसर्ग नाही. म्हणूनच हरित शहरांची मोहीम इतकी महत्त्वाची आहे. याबाबत प्रयोग झाले आहेत. मला वाटते शिकागोमध्ये असावेत. पण खात्री नाही. तिथे अनेक मोकळ्या जागा होत्या. हिंसाचार प्रबळ असणाऱ्या शहराच्या एका भागात. यापैकी काही जागा त्यांनी हरित केल्या. त्यांनी त्या मोकळ्या जागांमध्ये फुले, झाडे, झुडुपे लावली. आणि तिथले हिंसेचे प्रमाण एकदम कमी झाले. मग त्यांनी उरलेल्या अर्ध्या भागातही झाडे लावली. यावरून हे स्पष्ट होते. याखेरीज संशोधनातून असेही सिद्ध झाले आहे, की योग्य मानसिक वाढीसाठी मुलांना हरित निसर्गाची गरज असते. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण निसर्गाचा एक भाग आहोत. आणि आपण निसर्गाचा अनादर करत आहोत. हे आपल्या मुलांसाठी फार घातक आहे. आणि आपल्या नातवंडांसाठीही. कारण स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, हवामान आणि पावसाचे नियमन यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो. आपण काय केले त्याकडे पहा. हवामान संकटाकडे पहा. हे आपल्यामुळे घडले. आपणच हे केले. ख्रिस: सुमारे तीस वर्षांपूर्वी आपण वैज्ञानिक ते सामाजिक कार्यकर्ती असा बदल केलात. का? गुडाल: १९८६ सालची विज्ञान परिषद. तोपर्यंत मला पी. एच.डी. मिळालेली होती. चिंपांझींचे वर्तन सभोवतालच्या परिसरासोबत कसे बदलते, याबद्दल परिषद होती. आफ्रिकाभर सहा ठिकाणी पाहणीच्या जागा होत्या. आम्हांला वाटले, या शास्त्रज्ञांना एकत्र आणू, आणि याचा शोध घेऊ. हे फार रंजक होते. पण यापैकी एक सत्र निसर्ग संरक्षणाबद्दल होते. आणि एक सत्र बंदिस्त अवस्थेतील प्राण्यांबद्दल होते. उदाहरणार्थ, वैद्यकीय संशोधनातील प्राणी. ही दोन सत्रे माझ्यासाठी धक्कादायक ठरली. एक वैज्ञानिक म्हणून मी परिषदेला गेले होते, कार्यकर्ती म्हणून बाहेर आले. हा निर्णय मी घेतला नाही. मनात आत काहीतरी घडलं. ख्रिस: गेली चौतीस वर्षे मानव आणि निसर्गातले संबंध सुधारण्यासाठी आपण अथकपणे मोहीम राबवलीत. हे संबंध कसे असायला हवेत? गुडाल: हे प्रश्न पुन्हापुन्हा समोर येतात. मानवाला राहण्यासाठी जागा लागते. पण मला वाटते, समस्या हीच आहे, की आपला सधन समाज अतिशय लोभी झाला आहे. खरोखर, मोठमोठी पटांगणे असणारी चार चार घरे कोणाला लागतात? आणखी एक शॉपिंग मॉल आपल्याला कशासाठी हवा असतो? आणखी असेच बरेच काही. आपण अल्पकाळचा आर्थिक फायदा पाहतो आहोत. पैसा हा उपासना करण्याचा देव झाला आहे. निसर्गाशी असलेले अस्तित्वाचे सर्व बंध आपण हरवून बसलो आहोत. म्हणून आपण अल्पकाळचा आर्थिक फायदा किंवा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पृथ्वीचे संरक्षण किंवा आपल्या मुलांचे भविष्य याऐवजी. आता आपल्याला या गोष्टींची काळजी वाटत नाही. म्हणून, मी माझा लढा कधीच थांबवणार नाही. ख्रिस: चिंपांझी संरक्षणाच्या आपल्या कामात आपण जनतेला केंद्रस्थानी ठेवले. स्थानिक जनतेचा सहभाग मिळवला. यात कितपत यश मिळाले? पृथ्वीचे यशस्वीपणे रक्षण करण्यासाठी हे गरजेचे आहे, असे आपल्याला वाटते का? गुडाल: त्या सुप्रसिद्ध परिषदेनंतर मला वाटले, आफ्रिकेतले चिंपांझी नाहीसे का होताहेत, आणि जंगलांची काय परिस्थिती आहे याबद्दल जास्त जाणून घ्यायला हवे. मग मी थोडे पैसे जमवून चिंपांझी वस्तीच्या सहा देशांना भेट दिली. आणि चिंपांझींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे समजून घेतले. मांसासाठी हत्या होणे, जिवंत प्राण्यांचा विक्रय, सापळ्यात पकडले जाणे, मानवी लोकसंख्येची वाढ आणि त्यामुळे त्यांची शेती, गुरे आणि वस्तीसाठी जास्त जमिनीची गरज. पण अनेक माणसांना सोसावे लागणारे हाल सुद्धा मी पाहत होते. अतोनात दारिद्र्य, आरोग्य आणि शिक्षण यांचा अभाव, जमिनीची धूप. गॉम्बेच्या छोट्याशा राष्ट्रीय उद्यानावरून विमानाने जात असताना हे विचार असह्य झाले. एकेकाळी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाणारा हा विषुववृत्तीय जंगलपट्टा. आणि १९९० मध्ये उरले होते त्या जंगलाचे एक छोटेसे बेट. छोटेसे राष्ट्रीय उद्यान. सभोवतालच्या सगळ्या टेकड्या उजाड होत्या. त्यावेळी मला जोरदार धक्का बसला. आपण जर जनतेला पर्यावरणाची हानी न करता जगण्याच्या पद्धती शोधायला मदत केली नाही, तर आपण चिंपांझींना वाचवण्याचा प्रयत्न करूच शकत नाही. म्हणून जेन गुडाल संस्थेने "Take Care" हा कार्यक्रम सुरु केला. आम्ही त्याला "TACARE" म्हणतो. ही आमची निसर्ग संरक्षणाची पद्धत समाजावर आधारित आहे. ही सर्वसमावेशक आहे. निसर्ग संरक्षणाची साधने आम्ही गावकऱ्यांच्या हातात सोपवली आहेत. टांझानियामधले वन्य चिंपांझी आरक्षित जागेत राहत नाहीत. ते गावातल्या राखीव जंगलांत राहतात. लोक आता गावातल्या जंगलांवर नजर ठेवू लागले आहेत. आता त्यांना समजते, की जंगलांचे संरक्षण हे फक्त वन्यप्राण्यांसाठी नसून ते त्यांच्यासाठीदेखील आहे. जंगल ही त्यांची गरज आहे. त्यांना त्याचा अभिमान वाटतो. तिथले स्वयंसेवक कार्यशाळेत जातात. स्मार्टफोन कसे वापरावेत ते शिकतात. क्लाउड मध्ये माहिती अपलोड कशी करावी ते शिकतात. त्यामुळे सर्व काम पारदर्शी होते. झाडे पुन्हा उगवली आहेत. आता टेकड्या उजाड राहिल्या नाहीत. गॉम्बेभोवती एक मध्यवर्ती विभाग निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे चिंपांझींना १९९० पेक्षा जास्त मोठे जंगल उपलब्ध होईल. जंगलांमधले जोडमार्ग ते खुले करत आहेत. त्यामुळे विखुरलेल्या प्रजातींचा संबंध येईल जवळच्या नात्यात संबंध येणार नाही. होय, या पद्धतीला यश मिळाले आहे. आता ती आणखी सहा देशांत सुरु आहे. हीच पद्धत. ख्रिस: आपण आपले असामान्य विचार न थकता जगात सर्वत्र पोहोचवता. इतका प्रवास करता. सगळीकडे व्याख्याने देता. सर्वत्र लोकांना प्रेरणा देता. आपल्याला ही ऊर्जा कुठून मिळते? या कार्याचा इतका उत्कट ध्यास, कारण हे काम थकवणारं आहे. मोठ्या समुदायासमोर दिलेले प्रत्येक व्याख्यान शारीरिक दृष्टया थकवून टाकते. तरीही, आपण अजूनही हे करताहात. आपण हे कसे करता? गुडाल: तुम्हांला ठाऊक असेल, मी हट्टी आहे. मला हार मानणं आवडत नाही. मोठाल्या कंपन्यांचे अधिकारी जे जंगले नष्ट करतात, किंवा पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांचे निसर्ग रक्षणाचे नियम रद्द करणारे राजकारणी, मी कोणाबद्दल बोलते आहे तुम्ही जाणता. यांच्याविरुद्ध मी लढतच राहणार आहे. वन्यजीवनाविषयी मला काळजी आहे, तो माझा ध्यास आहे. मला निसर्गाचा ध्यास आहे. माझं जंगलांवर प्रेम आहे. त्यांचा नाश होताना पाहून मला दुःख वाटते. आणि मला मुलांविषयी फार आस्था वाटते. त्यांचे भवितव्य आपण हिरावून घेत आहोत. मी हार मानणार नाही. मला वाटते, माझ्याजवळ चांगली जनुके आहेत. ही देवाची देणगी आहे. आणि माझ्याजवळ जी दुसरी देणगी असल्याचे माझ्या लक्षात आले, ती म्हणजे संवाद. मग ते लिहिणे असो किंवा बोलणे. आपल्याला वाटते, असे जगभर फिरून काय होणार? पण दरवेळी मी व्याख्यान देते तेव्हा लोक सांगतात, "मी हार मानली होती. पण तुम्ही मला प्रेरणा दिलीत. आता मी माझा हातभार लावण्याची प्रतिज्ञा करतो." आणि "Roots and Shoots" ही मुलांची मोहीम आता पासष्ट देशांतून सुरु आहे. आणि त्यात वाढ होत आहे. सर्व वयोगट मानवाला, प्राण्यांना, पर्यावरणाला मदत करणारे प्रकल्प निवडताहेत. बाह्या सरसावून कामाला लागले आहेत. त्यांच्या डोळ्यांत एक चमक दिसते. त्यांना सांगायचं असतं, डॉ. जेन, पहा, आम्ही काय करतो आहोत पृथ्वीच्या रक्षणासाठी. त्यांना मी निराश कशी करू? ख्रिस: पृथ्वीच्या भविष्याबद्दल आपल्याला वाटणारी सर्वात मोठी काळजी कोणती? आजच्या आपल्या स्थितीबद्दल वाटणारी सर्वात मोठी भीती कोणती? गुडाल: मला वाटते, आपल्या हातात फार कमी वेळ असल्याची भीती. झालेल्या हानीची भरपाई करण्याची निदान सुरुवात करण्यासाठी, हवामान बदल मंदावण्यासाठी. वेळ संपत आली आहे. लॉकडाऊनच्या काळात जगभरात काय घडले ते आपण पाहिलेच. कोविड-१९ मुळे. शहरांवरचे आकाश स्वच्छ झाले. काही लोकांनी प्रथमच इतक्या शुद्ध हवेत श्वास घेतला. आणि रात्री इतके लखलखणारे आकाश प्रथमच पाहिले, जे यापूर्वी कधीच नीट पाहिले नव्हते. तर मला वाटते, सर्वात मोठी काळजी अशी, की जास्त लोकांना, लोकांना समजते, पण ते कृती करत नाहीत. जास्त लोकांना कृती करायला प्रेरित कसे करावे? गुडाल: नॅशनल जॉग्राफिकने आपल्याविषयी एक असामान्य चित्रफीत प्रदर्शित केली आहे. सहा दशकांच्या आपल्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारी. तिचे नाव आहे: "Jane Goodall: The Hope." तर, ही कोणती आशा? गुडाल: माझी आशा म्हणजे, माझी सर्वात मोठी आशा म्हणजे तरुणाई. चीनमध्ये लोक सांगतात, "होय, अर्थातच मला पर्यावरणाविषयी आस्था आहे. मी प्राथमिक शाळेत Roots and Shoots मध्ये होतो." Roots and Shoots द्वारे आम्ही नीतिमूल्यांचा पाठपुरावा करतो आहोत. या मुलांना भरपूर उत्साह आहे. एकदा समस्या समजल्या, त्यांच्यात कृती करण्याची क्षमता आहे, ते नद्या स्वच्छ करताहेत. अतिक्रमण करणाऱ्या प्रजाती काढताहेत. त्यांच्यापाशी कितीतरी कल्पना आहेत. आमच्याजवळ विलक्षण बुद्धिमत्तेचे लोक आहेत. त्यांच्या सहयोगाने आम्ही तंत्रज्ञान विकसित करत आहोत. त्यामुळे निसर्गाबरोबर एकात्मतेने राहता येईल. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यांत आपल्या रोजच्या कृतींचा परिणाम काय होतो त्याचा आपण विचार करूया. आपण काय विकत घेतो? ते कुठून आले? ते कसे निर्माण झाले? यासाठी पर्यावरणाची हानी झाली का? प्राण्यांचा छळ झाला का? बालमजूर वापरल्यामुळे ते स्वस्त आहे का? नैतिक पर्याय निवडा. पण तुम्ही गरिबीत राहत असाल, तर तसे करू शकणार नाही. सरतेशेवटी, या लोकांजवळ दुर्दम्य आशा आहे. ते अशक्य वाटणाऱ्या प्रश्नांचा सामना करतात आणि हार मानत नाहीत. त्यांना हार मानणं शक्य नसतं. पण काही गोष्टींशी मी लढू शकत नाही. मी भ्रष्टाचाराशी लढू शकत नाही. लष्कराची राजवट आणि हुकूमशहा यांच्याशी मी लढू शकत नाही. मला शक्य आहे तितकेच मी करू शकते. प्रत्येकाने आपल्या कुवतीप्रमाणे वाटा उचलला तर सर्व एकत्र मिळून पूर्णत्वाला येईल आणि यश मिळेल. ख्रिस: आता शेवटचा प्रश्न. अशी एक कल्पना, एक विचार सांगा, जो आज हे व्याख्यान पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आपण रुजवू इच्छिता. असा कोणता विचार सांगाल? गुडाल: फक्त एवढेच लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक दिवशी तुम्ही पृथ्वीवर परिणाम करत आहात. ते तुम्ही टाळू शकत नाही. अगदी पराकोटीच्या दारिद्र्यात राहत नसाल, तर हा परिणाम कोणत्या प्रकारचा असेल ते तुम्ही निवडू शकता. गरिबीत सुद्धा पर्याय उपलब्ध असतात. पण आपण सधन असलो, तर आपल्याजवळ जास्त पर्याय असतात. आपण सर्वांनी नैतिक पर्याय निवडले, तर आपल्या जगाचा प्रवास योग्य दिशेने होईल आणि ते पतवंडांसाठी सोडून जाताना इतकं निकृष्ट नसेल. मला वाटते, हा सर्वांसाठी संदेश आहे. कारण बऱ्याच लोकांना काय घडते आहे ते समजते आहे. पण त्यांना असहाय वाटते, निराश वाटते. आणि मग आपण काय करणार, म्हणून ते काहीच करत नाहीत. उदासीन राहतात. उदासीनता हा एक मोठा धोका आहे. ख्रिस: डॉ. जेन गुडाल, वा. आपल्या असामान्य आयुष्याबद्दल मी आपले खूप आभार मानतो. आपल्या कार्याबद्दल, आणि आज इथे आमच्याशी इतका वेळ बोलल्याबद्दल. धन्यवाद. गुडाल: धन्यवाद.