Marathi subtitles

← मुलींचा आवाज दाबणाऱ्या सात सवयी नष्ट कशा कराव्यात.

Get Embed Code
33 Languages

Showing Revision 15 created 12/07/2019 by Arvind Patil.

 1. शाह रुख खान:
  मुलींनी छान दिसावं. बोलू नये.
 2. गप्प बसा. चूप.
 3. हे शब्द वापरून मुलींना गप्प केलं जातं.
  अगदी बालपणापासून,
 4. प्रौढपणी, आणि
 5. थेट म्हातारपणापर्यंत.
 6. यापुढील वक्त्यांची ओळख:
  स्त्रीशक्तीच्या खऱ्याखुऱ्या पुरस्कर्त्या.

 7. जागतिक बँक, युनो
  आणि देशविदेशांतील
 8. अनेक एनजीओ संस्थांच्या
 9. गरिबी, लैंगिकता आणि विकास
  या विषयांबद्दलच्या सल्लागार.
 10. त्या स्वतःला
  सांस्कृतिक गुप्तहेर म्हणवतात.
 11. या सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि लेखिकेचं
  जोरदार स्वागत करू.
 12. दीपा नारायण.
 13. (संगीत)

 14. (टाळ्या)

 15. सर्व प्रेमळ पालकांना
  वाटतं, की

 16. मुलींचं चांगल्या रीतीने
  संगोपन करावं.
 17. पण प्रत्यक्षात मात्र ते
 18. मुलींवर बंधनं घालून
  त्यांना चिरडून टाकतात.
 19. त्यांची मनं चिरडून टाकून
 20. त्यांना छळ सोसायला तयार करतात.
 21. खरं तर हे इतकं भयानक आहे, की
 22. पालकांना ते सहन होत नाही. म्हणून,
 23. त्याचं रूप बदललं जातं.
 24. भारतात आम्ही त्याला "तडजोड" असं म्हणतो.

 25. हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल.
 26. "डार्लिंग, जरा जुळवून घे ना थोडंसं.
 27. फक्त थोडंसं जुळवून घे.
 28. काहीही घडलं, तरी जरा तडजोड कर. "
 29. "तडजोड" मुलींना शिकवते, शक्तिहीन बना.
 30. जगू नका. अदृश्य रहा.
 31. स्वत्व विसरा.
 32. आणि ती मुलांना शिकवते,
  जगावर सत्ता गाजवा. ताकद दाखवा.
 33. हे सगळं घडत असतानाच आपण लिंगसमभाव
  आणि महिलांचं सक्षमीकरण याबद्दल बोलत असतो.
 34. २०१२ मध्ये दिल्लीत चालत्या बसमध्ये
  घडलेल्या सामूहिक बलात्कारानंतर

 35. मला छळामागची कारणं जाणून घेण्याची
  गरज वाटू लागली.
 36. म्हणून मी एक साधा प्रश्न विचारू लागले.
 37. आजच्या युगात, एक चांगली स्त्री किंवा
  चांगला पुरुष असणं, म्हणजे काय?
 38. यावर आलेल्या उत्तरांचं, खास करून
  तरुण पिढीच्या उत्तरांचं,
 39. मला इतकं आश्चर्य वाटलं, की
 40. हा माझ्या संशोधनाचा प्रकल्प बनला आणि
  त्याने माझं आयुष्य व्यापून टाकलं.
 41. तीन वर्षांत मी ६०० स्त्रिया, पुरुष
  आणि मुलांशी बोलले.

 42. हे सर्व सुशिक्षित, मध्यमवर्गीय होते.
 43. मी एकूण १८०० तास त्यांचं बोलणं ऐकलं,
 44. आणि त्याबद्दल ८००० पानं भरून टिपणं लिहिली.
 45. त्यांचा अर्थ लावायला मला
  आणखी एक वर्ष लागलं.
 46. आजकाल सर्वत्र आपण सुशिक्षित,
  सुरेख पोषाखातल्या स्त्रिया पाहतो.

 47. आज इथे जमलेल्या स्त्रिया किंवा
  मीही दिसते, तशाच.
 48. त्यामुळे आपल्याला वाटतं, की जग बदललं आहे.
 49. पण हे बाह्य बदल पूर्णपणे
  दिशाभूल करणारे आहेत.
 50. कारण आपल्यामध्ये अंतर्गत बदल
  झालेलेच नाहीत.
 51. म्हणून, आज इथे मी
  गरिबांविषयी बोलणार नाही.

 52. आज मी मध्यमवर्ग आणि उच्चवर्गाविषयी
  बोलणार आहे.
 53. कारण हाच वर्ग या सत्याकडे सर्वात जास्त
  डोळेझाक करतो.
 54. आपण फक्त पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, की
 55. स्त्रियांना शिक्षण मिळालं,
 56. नोकऱ्या मिळाल्या,
 57. त्या कमावत्या झाल्या, की
 58. त्यांना समान हक्क मिळतील,
  त्या सक्षम होतील, मुक्त होतील.
 59. तसं झालेलं नाही.
 60. का?
 61. माझ्या संशोधनातून मला
  सात सवयी सापडल्या आहेत.

 62. त्या स्त्रियांना मिटवून टाकतात.
 63. त्यांना पार अदृश्य करून टाकतात.
 64. पण या सवयी समाजात टिकून राहिल्या आहेत,
 65. कारण त्या आपल्या ओळखीच्या आहेत.
 66. त्यांना आपण चांगल्या, सोज्वळ सवयी मानतो.
 67. अर्थात, चांगल्या, सोज्वळ गोष्टी कोणी
  कशाला बदलेल, किंवा सोडून देईल?
 68. एकीकडे आपण आपल्या अपत्यांवर प्रेम करतो.
 69. मुलींवर प्रेम करतो.
 70. आणि दुसरीकडे त्यांना चिरडून टाकतो.
 71. पहिली सवय: मुलींना शरीर नसतं.

 72. मुलीला नाहीसं करण्याची पहिली पायरी
  म्हणजे तिचं शरीर नाहीसं करणं.
 73. तिला शरीर नाही अशी बतावणी करणं.
 74. २३ वर्षे वयाची आकांक्षा म्हणते,
 75. "आमच्या घरी आम्ही कधीच शरीराबद्दल
  बोलत नाही. कधीच नाही."
 76. आणि याच अबोल शांततेमुळे
 77. करोडो मुलींवर लैंगिक अत्याचार होतात,
 78. पण त्या आपल्या आईलासुद्धा
  त्याबद्दल सांगत नाहीत.
 79. इतरांच्या नकारात्मक टिपण्या ऐकून
 80. ९० टक्के मुलींना स्वतःचंच शरीर
  आवडेनासं होतं.
 81. एखाद्या मुलीने स्वतःचं शरीर नाकारणं म्हणजे
 82. स्वतःचं हक्काचं एकमेव घर नाकारणं.
 83. मग अदृष्यपणा आणि असुरक्षित भावना
 84. हा तिच्या आयुष्याचा डळमळीत पाया ठरतो.
 85. दुसरी सवय: गप्प राहा. चूप.

 86. तुला अस्तित्वच नाही,
 87. शरीरही नाही.
 88. मग तुला आवाज तरी कसा असेल?
 89. अगदी सर्वच स्त्रियांनी मला सांगितलं,
 90. "लहानपणी आई ओरडायची.
 91. म्हणायची, बोलू नकोस. गप्प बस. चूप.
 92. हळू बोल. वाद घालू नकोस.
  उलट उत्तरं देऊ नकोस.
 93. उलटून बोलू नकोस."
 94. तुम्ही सर्वांनीही हे ऐकलं असेल.
 95. यामुळे मुली घाबरतात, आणि मिटून जातात.
 96. त्या गप्प होतात, आणि म्हणतात,
 97. "सोडून देऊ. जाऊ दे.
 98. काय उपयोग? कोणी ऐकणार नाही."
 99. सुशिक्षित स्त्रिया म्हणाल्या,
 100. आमची सर्वात मोठी समस्या म्हणजे
 101. धीटपणे बोलता न येणं.
 102. जणु आम्ही बोललो तर
  कोणी गळ्यावर टाच लावून
 103. गळाच दाबणार आहे.
 104. बोलता न आल्यामुळे स्त्रियांच्या
  व्यक्तिमत्त्वाचे तुकडे पडतात.
 105. तिसरी सवय: लोकांना खूष करा.

 106. इतरांना खूष करा.
 107. सतत हसणारी, कशालाच नकार न देणारी,
 108. कोणी शोषण केलं तरीही न रागावणारी
 109. अशी छानशी स्त्री सर्वांनाच आवडते.
 110. १८ वर्षे वयाची अमिषा म्हणाली,
 111. "माझे वडील म्हणत,
 112. तू हसताना दिसली नाहीस तर
  मला काही बरं वाटत नाही."
 113. म्हणून ती हसते.
 114. म्हणजे तिच्या वडिलांनी तिला शिकवलं, की
 115. तुझ्या आनंदापेक्षा
  माझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे.
 116. सतत सर्वांना खूष ठेवण्याचा
  प्रयत्न करत राहिल्यामुळे
 117. मुली निर्णय घ्यायला घाबरतात.
 118. त्यांना काही विचारलं, की म्हणतात,
 119. "काही चालेल. कुछ भी.
 120. मला सगळं चालतं. चलता है."
 121. २५ वर्षे वयाची दर्शा
 122. मोठ्या अभिमानाने सांगते,
 123. "मी अगदी लवचिक आहे.
 124. इतरांना जशी हवी तशी मी होऊ शकते."
 125. अशा मुली आपली स्वप्नं विसरून जातात.
 126. इच्छा विसरून जातात.
 127. आणि कोणाला त्याची दखल नसते.
 128. एक नैराश्य सोडून.
 129. ते त्यांना ग्रासतं.
 130. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा
  आणखी एक तुकडा निखळून पडतो.
 131. चौथी सवय: तुम्हांला लैंगिकता नाही.

 132. १.३ अब्ज लोकसंख्येच्या आपल्या देशात
 133. लैंगिकता ही काही नवी गोष्ट नव्हे.
 134. नवी गोष्ट ही, की
  स्त्रीला लैंगिक इच्छा असण्याचा हक्क आहे,
 135. हे आता मान्य होऊ लागलं आहे.
 136. पण ज्या स्त्रीला स्वतःचं शरीर
  स्वतःच्या मालकीचं असण्याची मुभा नाही,
 137. जिला स्वतःच्या शरीराबद्दल
  शिक्षण दिलं जात नाही,
 138. जिच्यावर कदाचित लैंगिक अत्याचार
  झाले असतील,
 139. जिला नाही म्हणता येत नाही,
 140. आणि जिला स्वतःची शरम वाटत असेल,
 141. ती स्वतःची लैंगिक इच्छापूर्ती कशी करणार?
 142. स्त्रीची लैंगिकता दडपली गेली आहे.
 143. पाचवी सवय: स्त्रियांवर विश्वास ठेवू नका.

 144. कल्पना करा, सर्व स्त्रियांची एकजूट झाली,
 145. तर जग किती बदलेल.
 146. आणि नेमकं हेच होऊ नये, म्हणून
 147. आमची संस्कृती पुरुषांशी इमान राखणे,
  कुटुंबातल्या गोष्टी गुप्त ठेवणे
 148. अशा गोष्टींना मोठं नैतिक महत्त्व देते.
 149. एकामागून एक स्त्रियांनी सांगितलं,
 150. "माझा फक्त एकाच स्त्रीवर विश्वास आहे.
 151. आणि ती स्त्री म्हणजे मी स्वतः."
 152. ३० वर्षे वयाची रुचि
 153. दिल्ली विद्यापीठात स्त्रियांच्या
  सबलीकरणावर काम करते. तीदेखील म्हणाली,
 154. "माझा स्त्रियांवर विश्वास नाही.
  त्या मत्सरी असतात, पाठीत खंजीर खुपसतात."
 155. साहजिकच, शहरांमधून
 156. स्त्रिया महिला गटांत सामील होत नाहीत.
 157. यामागचं कारण विचारल्यावर सांगतात,
  "मला कुचाळक्या करायला वेळ नाही."
 158. एकट्या स्त्रीला नेस्तनाबूत करणं
  जास्त सोपं असतं.
 159. सहावी सवय: आपल्या इच्छेपेक्षा
  कर्तव्य महान.

 160. चांगल्या मुलीची ही लांबलचक व्याख्या
  सांगणारी मुस्कान फक्त १५ वर्षांची आहे.
 161. "दयाळू, मृदु स्वभावाची, नम्र, प्रेमळ,
  काळजी घेणारी,
 162. सत्यवचनी, आज्ञाधारक, मोठ्यांचा आदर करणारी,
 163. विनाअट मदत करणारी, चांगुलपणाने वागणारी,
  आणि आपली कर्तव्ये पार पाडणारी."
 164. बाप रे!
 165. कर्तव्य पार पाडून होईपर्यंत
 166. उरलीसुरली इच्छा नाहीशी होणारच.
 167. मग जेव्हा त्यागमूर्ती आईजवळ
 168. जेवणाखेरीज दुसरा विषय उरत नाही,
 169. फक्त "जेवलास का? जेवायला काय करू?"
 170. तेव्हा २४ वर्षीय सौरभ सारखे पुरुष
  त्यांना "कंटाळवाणी आई" म्हणतात.
 171. स्त्री केवळ अवशेषमात्र उरते.
 172. सातवी सवय: पूर्णपणे परावलंबी व्हा.

 173. या सर्व सवयी स्त्रीला चिरडून टाकतात.
 174. तिचं मन भीतीने भरून टाकतात.
 175. आणि आपल्या चरितार्थासाठी पूर्णपणे
  पुरुषांवर अवलंबून राहायला भाग पाडतात.
 176. यामुळे पुरुषी वर्चस्व कायम राहतं.
 177. म्हणजे, चांगल्या आणि नैतिक
  समजल्या गेलेल्या या सात सवयी

 178. मुलींचं आयुष्य ओरबाडून घेतात,
 179. आणि पुरुषांना छळ करू देतात.
 180. आपण बदललं पाहिजे.

 181. बदलायचं कसं?
 182. एक सवय म्हणजे फक्त एक सवय, इतकंच.
 183. प्रत्येक सवय आपण लावून घेतलेली असते.
 184. तशीच ती आपण मोडूही शकतो.
 185. स्वतःमधला हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे.
 186. मला सुद्धा बदलावं लागलं होतं.
 187. पण यामुळे करोडो स्त्रियांना
 188. चिरडून टाकणारा समाज बदलणार नाही.
 189. म्हणून आपल्याला पार मुळापर्यंत जायला हवं.
 190. चांगली स्त्री किंवा चांगला पुरुष असणं
  या शब्दांचे अर्थ बदलायला हवेत.
 191. कारण प्रत्येक समाजाचा हा पाया आहे.
 192. आपल्याला लवचिक स्त्रिया नकोत,
  लवचिक व्याख्या हव्यात.
 193. पुरुषांसाठी सुद्धा.
 194. हा मोठा सामाजिक बदल पुरुषांच्या
  सहभागाशिवाय घडून येणार नाही.
 195. आम्हांला तुमची गरज आहे.
 196. बदलाला पाठिंबा देणाऱ्या पुरुषांची गरज आहे,
 197. जोरदार बदल घडवून आणण्यासाठी.
 198. नाहीतर आपल्या मुलींचं आणि मुलांचं
 199. आयुष्य सुरक्षित आणि मुक्त व्हायला
 200. दोन शतकं लागतील.
 201. कल्पना करा, अर्धा अब्ज स्त्रिया
  एकत्र येऊन, पुरुषांच्या पाठिंब्यासहित

 202. एकमेकांशी वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर
 203. बदल घडवण्यासंबंधी संवाद साधताहेत.
 204. पुरुष आपल्या वर्तुळांत हाच संवाद करताहेत.
 205. स्त्रिया आणि पुरुष एकत्र येऊन
  एकमेकांचं बोलणं ऐकून घेताहेत.
 206. कोणाला दोषी न ठरवता.
 207. आरोप न ठेवता, शरम न बाळगता,
 208. कल्पना करा, आपण किती बदलून जाऊ.
 209. आपण सगळे मिळून हे करू शकतो.
 210. स्त्रियांनो, जुळवून घेऊ नका.
 211. पुरुषांनो, तडजोड करा.
 212. ती वेळ आता आली आहे.
 213. धन्यवाद.

 214. (टाळ्या)

 215. फार चांगलं व्याख्यान. सुरेख.

 216. सर्वांतर्फे अभिवादन, दीपा.
 217. त्यांचं व्याख्यान ऐकताना
  मला जाणवलं, की
 218. स्त्रियांसोबतचं आपलं साधं बोलणंसुद्धा
 219. किती आक्रमक असतं.
 220. उदाहरणार्थ, माझ्या मुलीला
  मी कधीकधी म्हणतो,
 221. "तू हसलीस की मला बरं वाटतं,
  नाहीतर वाईट वाटतं."
 222. मी पुन्हा असं कधीच म्हणणार नाही.
 223. आजपासून मी माझ्या मुलीला सांगेन,
 224. तू जे करशील ते मला आवडेल.
 225. आणि मला नाही आवडलं,
  तर माझ्याकडे दुर्लक्ष कर.
 226. तुला जे आवडेल, तेच तू कर. बरोबर?
 227. हो. (टाळ्या)

 228. अपुऱ्या कहाण्या, इच्छा,

 229. न मिळालेलं स्वातंत्र्य
  याबद्दल प्रथम ऐकताना
 230. तुम्हांला काय वाटलं?
 231. तेही सुस्थितीत असाव्यात,
  असं वाटणाऱ्या मुलींकडून.
 232. फार निराश वाटलं.

 233. मला धक्का बसला.
  म्हणूनच मी तिथे थांबू शकले नाही.
 234. त्याआधी असं काही संशोधन करून
  पुस्तक लिहिण्याचा माझा बेत नव्हता.
 235. यापूर्वी मी १७ पुस्तकं लिहिली आहेत.
  आणि मला वाटलं होतं, की माझं कार्य संपलं.
 236. मी दिल्लीमधल्या सेंट स्टीफन्स कॉलेजसारख्या
 237. अनेक उच्चभ्रू कॉलेजांत गेले.
 238. एक स्त्री किंवा एक पुरुष असणं म्हणजे काय
 239. याविषयीची तिथल्या तरुण मुलामुलींची
  मतं ऐकली.
 240. ती मतं मला माझ्या नव्हे, तर
  माझ्या आईच्या पिढीतली वाटली.
 241. मग मी आणखी निरनिराळ्या कॉलेजांमध्ये गेले.
 242. मला सर्वात प्रकर्षाने जाणवलं, की
 243. प्रत्येक स्त्रीला एकटेपणा वाटतो,
 244. ती आपली भीती आणि आपली वागणूक दडवते,
 245. कारण तिला तो आपला स्वतःचा दोष वाटतो.
 246. हा आपला दोष नव्हे, तर
  आपल्याला मिळालेली शिकवणूक.
 247. याबद्दल लक्षात आलेली
  सर्वात मोठी गोष्ट अशी,
 248. की आपण हे ढोंग बंद केलं,
 249. की जग बदलतं.
 250. मुलींनो, दीपा यांचं म्हणणं
  पटतं आहे का तुम्हांला?

 251. (टाळ्या)

 252. ती पहा, ती मुलगी म्हणते आहे,

 253. "त्या काय म्हणाल्या ते ऐकलंस?
  तू मला हेच सांगतोस."
 254. हो. असंच असायला हवं.
 255. तू, मुला, तू तडजोड कर.
  यापुढे आम्ही तडजोड करणार नाही.
 256. (टाळ्या)

 257. आभारी आहे.

 258. (टाळ्या)