कॉम्प्युटर्सना एक गोष्ट खूप चांगली जमते, कमांड्स रिपीट करणं. आपल्याला एकच गोष्ट सलग पुन्हा पुन्हा करावी लागली तर खूप कंटाळा येतो. पण कॉम्प्युटर एकच गोष्ट लक्षावधी किंवा अगदी कोट्यावधी वेळा करू शकतो, तेसुद्धा न कंटाळता आणि अगदी चांगल्या पद्धतीनं. उदाहरणार्थ, मला जर फेसबुकवरच्या प्रत्येकाला ईमेल पाठवून happy birthday म्हणायचं असेल तर मला प्रत्येकाला असं ईमेल लिहायला शंभर वर्षं लागतील. पण कोडच्या फक्त काही ओळी लिहून, मी एका सिस्टीमद्वारे फेसबुकवरच्या सगळ्यांना ईमेल पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो. हेच काम लूप्स करतात आणि म्हणूनच ते उपयोगी पडतात. आणि कॉम्प्युटर्सना ही गोष्ट चांगली जमते. या उदाहरणात तुमचं ध्येय असणार आहे, बर्डला हलवून डुकरापर्यंत पोचवणं. आता आपण "repeat" ब्लॉक वापरू शकतो. म्हणजे हे काम अगदी सोपं होईल. तुम्ही एकतर कॉम्प्युटरला "move forward" कमांड पाचवेळा देऊन बर्डला डुकराच्या दिशेत प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे सरकवू शकता. किंवा तुम्ही कॉम्प्युटरला "move forward" एकदाच सांगून ते 5 वेळा "repeat" करायला सांगू शकता, म्हणजे तीच गोष्ट घडेल. त्यामुळं हे करण्यासाठी "move forward" कमांड ओढा आणि ती "repeat" ब्लॉकमध्ये ठेवा. मग त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला किती पावलं पुढे जायचंय त्याप्रमाणे हा ब्लॉक कितीवेळा पुन्हा पुन्हा व्हायला हवाय, ते लिहा. आता अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही हव्या तेवढ्या कमांड्स "repeat" ब्लॉकमध्ये लिहू शकता. या उदाहरणात तुम्ही त्याला पुढे जायला आणि डावीकडे वळायला सांगत आहात, आणि ही गोष्ट तो पाचवेळा करेल. ठीक आहे. मस्त कामगिरी करा आणि मजा करा :-)