इंटरनेट: आयपी अॅड्रेसेस आणि डीएनएस हाय! माझं नाव पाओला. मी मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. चला, इंटरनेट कसं चालतं त्याबद्दल बोलूया. माझं काम नेटवर्क्स एकमेकांशी बोलू शकण्यावर अवलंबून असतं, पण 1970च्या दशकात, यासाठी कोणतीही स्टँडर्ड पद्धत नव्हती. विंट सर्फ आणि बॉब कान यांनी इंटरनेटवर्किंग प्रोटोकॉल तयार केल्यानंतरच हा संवाद शक्य झाला. या शोधामुळं आपण सध्या ज्याला इंटरनेट म्हणतो त्याची पायाभरणी झाली. इंटरनेट म्हणजे नेटवर्क्सचं नेटवर्क. यामध्ये सर्व जगातली कोट्यावधी डिव्हायसेस जोडलेली आहेत. त्यामुळे तुम्ही वायफायद्वारे लॅपटॉप किंवा फोनने जोडलेले असता, तेव्हा ते वायफाय कनेक्शन इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (किंवा आयएसपीला जोडलेले असते), आणि तो आयएसपी एकमेकांना जोडलेल्या लक्षावधी नेटवर्क्सद्वारे तुम्हाला जगातील कोट्यावधी डिव्हायसेसना जोडतो. खूप लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही ती म्हणजे, इंटरनेट हे एक डिझाईन तत्त्वज्ञान आणि आर्कीटेक्चर आहे आणि ते प्रोटोकॉल्सच्या संचाद्वारे व्यक्त केलेलं आहे. प्रोटोकॉल म्हणजे नियम आणि स्टँडर्ड्सचा एक ठरलेला संच, जर सगळे पक्ष तो वापरण्यास तयार झाले तर तो त्यांना कोणत्याही त्रासाविना संवाद साधण्याची परवानगी देतो. इंटरनेट प्रत्यक्षात कसं काम करतं ते यापेक्षा कमी महत्त्वाचं आहे की या डिझाईन तत्त्वज्ञानामुळं इंटरनेट नवीन संवादाशी जुळवून घेऊ शकलेलं आहे आणि स्वीकारू शकलं आहे. कारण नवीन तंत्रज्ञानानं कोणत्यातरी प्रकारे इंटरनेट वापरण्यासाठी, कोणते प्रोटोकॉल्स वापरायचे एवढंच त्याला माहिती असावं लागतं. इंटरनेटवर सगळया वेगवेगळया डिव्हायसेसचे वेगवेगळे अॅड्रेसेस असतात. इंटरनेटवरचा अॅड्रेस म्हणजे फक्त एक नंबर असतो, फोन नंबर किंवा रस्त्याच्या पत्त्यासारखा, तो नेटवर्कला जोडलेल्या प्रत्येक कॉम्प्युटर किंवा डिव्हाईससाठी वेगळा असतो. बहुतेक सर्व घरे आणि व्यवसाय यांचा पत्ता असतो, तसंच हे आहे. एखाद्या व्यक्तीला पोस्टाने पत्र पाठवण्यासाठी तुम्हाला ती व्यक्ती माहीत असणं आवश्यक नाही, पण तुम्हाला त्यांचा पत्ता माहिती असणं आवश्यक आहे आणि पत्ता व्यवस्थित कसा लिहायचा ते माहिती पाहिजे म्हणजे ते पत्र पोस्टाद्वारे योग्य ठिकाणी पोचेल. कॉम्प्युटर्सवरची अॅड्रेसिंग सिस्टीम याच प्रकारची असते आणि ती इंटरनेट संप्रेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या इंटरनेट प्रोटोकॉल किंव आयपी नावाच्या महत्त्वाच्या प्रोटोकॉलपैकी एक आहे. कॉम्प्युटरच्या अॅड्रेसला त्याचा आयपी अॅड्रेस म्हणतात. एखाद्या वेबसाईटला भेट देणे म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरनं दुसऱ्या कॉम्प्युटरला माहिती मागणं. तुमचा कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरच्या आयपी अॅड्रेसवर मेसेज पाठवतो आणि त्याचा मूळ पत्तासुद्धा पाठवतो. म्हणजे दुसऱ्या कॉम्प्युटरला प्रतिसाद कुठं पाठवायचा ते कळतं. तुम्ही आयपी अॅड्रेस पाहिलेला असेल. त्यात नुसत्या संख्या असतात. या संख्या एका श्रेणीमध्ये तयार केलेल्या असतात. घराच्या पत्त्यामध्ये देश, शहर, रस्ता आणि घर क्रमांक असतो, तसंच, आयपी अॅड्रेसमध्ये अनेक भाग असतात. सगळ्या डिजिटल डेटाप्रमाणे यातील प्रत्येक संख्या बीट्सने दर्शवली जाते. पारंपरिक आयपी अॅड्रेसमध्ये 32 बीट्स असतात, अॅड्रेसच्या प्रत्येक भागासाठी 8 बीट्स. सुरुवातीच्या संख्या सामान्यपणे देश आणि डिव्हाईसचं प्रादेशिक नेटवर्क दर्शवतात. नंतर येतं सबनेटवर्क, आणि शेवटी त्या विशिष्ट डिव्हाईसचा अॅड्रेस. आयपी अॅड्रेसिंगच्या या व्हर्जनला IPv4 म्हणतात. ते 1973 मध्ये डिझाईन केलं गेलं आणि 80 च्या दशकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर वापरात आलं आणि इंटरनेटला जोडल्या जाणाऱ्या डिव्हायसेसना 400 कोटीपेक्षा जास्त वेगवेगळे अॅड्रेस देण्यात आले. पण इंटरनेट अगदी विंट सर्फ यांनी कल्पना केली होती त्यापेक्षासुद्धा खूप जास्त लोकप्रिय झालं आहे आणि 400 कोटी वेगवेगळे अॅड्रेस पुरेसे होणार नाहीत. आता आपण अधिक मोठे आयपी अॅड्रेस फॉरमॅट IPv6 साठी अनेक-वर्षे कराव्या लागणाऱ्या बदलाच्या स्थितीत आहोत. यामध्ये प्रत्येक अॅड्रेससाठी 128 बीट्स लागतात आणि ते 340 अनडीझिलीअन वेगवेगळे अॅड्रेस पुरवते. जे पृथ्वीवरील वाळूच्या प्रत्येक कणाला आयपी अॅड्रेस द्यायचा असेल तरीसुद्धा पुरतील. बऱ्याचशा वापरकर्त्यांना इंटरनेट अॅड्रेस दिसत नाही किंवा ते त्याची फिकीर करत नाहीत. डोमेन नेम सिस्टीम किंवा डीएनएस www.example.com सारखी नावे अॅड्रेसशी जोडते. तुमचा कॉम्प्युटर डोमेन नेम्स शोधण्यासाठी डीएनएस वापरतो आणि संबंधित आयपी अॅड्रेस मिळवतो जो तुमच्या कॉम्प्युटरला इंटरनेटवरच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी वापरला जातो. आणि ते काहीसं अशाप्रकारे होतं: (आवाज 1) "ए हाय, मला www.code.org वर जायचंय." (आवाज 2) "अं..मला त्या डोमेनचा आयपी अॅड्रेस माहिती नाही. मला कोणालातरी विचारू दे. ए, तुला माहिती आहे का code.org ला कसं जायचं?" (आवाज 3) " हो, इथं आहे. 174.129.14.120 वर." (आवाज 2) "ठीक आहे, धन्यवाद, मी तो लिहून पुन्हा मला लागेल म्हणून सेव्ह करून ठेवणार आहे. हाच अॅड्रेस तुला हवा होता." (आवाज 1) "मस्त! धन्यवाद." कोट्यावधी डिव्हायसेसची प्रणाली ज्यातली एक वेबसाईट शोधायची आहे, ती आपण कशी डिझाईन करतो? एकच डीएनएस सर्व्हर सगळ्या डिव्हायसेसकडून येणाऱ्या विनंत्या हाताळू शकत नाही. याच उत्तर आहे डीएनएस सर्व्हर्स वितरीत श्रेणीमध्ये जोडलेले असतात, आणि त्यांचे विभाजन वेगवेगळ्या विभागात केलेले असते, त्यात .org, .com, .net अशा प्रमुख डोमेन्सची जबाबदारी विभागलेली असते. डीएनएस सुरुवातीला सरकार आणि शैक्षणिक संस्थांसाठी खुला आणि सार्वजनिक प्रोटोकॉल होता. खुलेपणामुळे डीएनएस सायबर हल्ल्यांना बळी पडू शकते. डीएनएसवरचा एक उदाहरणादाखलचा हल्ला म्हणजे डीएनएस स्पूफिंग. जेव्हा हॅकर डीएनएस सर्व्हरला प्रवेश करतो आणि ते बदलून त्याच डोमेन नावाला चुकीचा आयपी अॅड्रेस देतो. त्यामुळे हल्लेखोर लोकांना बनावट वेबसाईटवर पाठवतो. जर हे तुमच्याबाबतीत झाले तर तुम्ही अधिक समस्यांना बळी पडता. कारण तुम्ही एक बनावट वेबसाईट खरी असल्याप्रमाणे वापरत असता. इंटरनेट भव्य आहे आणि रोज अधिकाधिक वाढते आहे. पण डोमेन नेम प्रणाली आणि इंटरनेट प्रोटोकॉल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेले आहेत की इंटरनेट कितीही वाढलं तरी ते वाढवता येतात.