बराच काळ मला दोन रहस्यं सतावत होती. त्यांचा उलगडा होत नव्हता. खरं तर, मला खोलात जाऊन ती सोडवायची फार भीती वाटत होती. पहिलं रहस्य सांगतो. आजवरच्या माझ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात मी पाहतो आहे, की इंग्लंड, अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये गंभीर स्वरूपाचे नैराश्य आणि चिंताविकार दरवर्षी वाढत चालले आहेत. यामागचं कारण मला जाणून घ्यायचं होतं. हे विकार आपल्याला का जडताहेत? रोजचा दिनक्रम पार पाडणं अशक्य वाटणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत का जाते आहे? हे समजून घेण्याची इच्छा मला वाटली, यामागे एक खाजगी रहस्य आहे. मला आठवतं, तरुणपणी मी डॉक्टरांना म्हणालो होतो, "मला वाटतं, की माझ्या अंगातून जणु वेदना वाहते आहे. तिच्यावर माझं नियंत्रण नाही. तिच्यामागचं कारण मला ठाऊक नाही. मला या वेदनेची खूप शरम वाटते आहे." डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली. त्यांचा हेतू चांगलाच होता. त्यांनी सगळं फार सोपं करून टाकलं. ते पूर्ण चुकीचं नव्हतं. ते म्हणाले, "यामागची कारणं वैद्यकशास्त्राला ठाऊक आहेत. काही लोकांच्या डोक्यात निसर्गतःच रासायनिक असंतुलन असतं. तू त्यापैकीच एक. आता इतकंच करायचं, काही औषधं घ्यायची. त्यामुळे तुझं रासायनिक संतुलन ठीक होईल." मग मी पॅक्सील किंवा सेरोक्साट घेऊ लागलो. ही एकाच औषधाची निरनिराळ्या देशातली नावं. मला बरं वाटू लागलं. मोठा आधार मिळाला. पण थोड्याच दिवसांत वेदना परत जाणवू लागली. म्हणून औषधाची मात्रा वाढवण्यात आली. तेरा वर्षं, मी जितकी मोठ्यात मोठी मात्रा घेणं शक्य आहे, तितकी घेत होतो. यापैकी बराचसा काळ, आणि नंतरही वेदना होतच होत्या. मग मी स्वतःला विचारू लागलो, "हे असं का? आजच्या संस्कृतीच्या समजानुसार मला जे सांगण्यात आलं, ते सर्व मी केलं आहे. तरीही हा त्रास का?" या दोन रहस्यांचा शोध घेण्यासाठी आणि पुस्तकलेखनासाठी माहिती मिळवण्यासाठी मी जगभर फिरलो. चाळीस हजार मैल प्रवास केला. मला जगातल्या मोठमोठ्या तज्ज्ञांना विचारायचं होतं, नैराश्य आणि चिंताविकार कशामुळे होतात? या विकारांवर मात कशी करायची? या विकारांचा सामना करून त्यातून मुक्त झालेल्या लोकांनाही भेटायचं होतं. या प्रवासात भेटलेल्या विलक्षण लोकांकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. मला सर्वात महत्त्वाचं समजलं ते असं: नैराश्य आणि चिंताविकार यांची नऊ वेगवेगळी कारणं आहेत. त्यांचे शास्त्रीय पुरावे आहेत. त्यापैकी दोन जीवशास्त्रीय आहेत. या विकारांना बळी पडण्याचं प्रमाण जनुकांवर अवलंबून असतं. पण जनुकं आपलं भविष्य ठरवत नाहीत. तसंच, नैराश्यामुळे मेंदूत घडून येणाऱ्या जीवशास्त्रीय बदलांमुळे त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. पण या विकारांची कारणं म्हणून सिद्ध झालेल्या बऱ्याचशा घटकांचा आपल्या जैविकतेशी संबंध नसतो. त्यांचा संबंध असतो, आपल्या जीवनशैलीशी. हे घटक समजून घेतल्यावर सापडणारे निराळे उपाय, रासायनिक नैराश्यरोधकांसमवेत सुचवले गेले पाहिजेत. उदाहरणार्थ, तुम्हांला एकटेपणा वाटत असेल, तर पुढे नैराश्य येण्याची शक्यता वाढते. व्यवसायाच्या ठिकाणी कामावर तुमचं नियंत्रण नसेल, सांगितलेलं काम निमूट करावं लागत असेल, तर नैराश्याची शक्यता वाढते. तुम्ही बाहेर खुल्या निसर्गात फारसे जात नसाल, तर नैराश्याची शक्यता वाढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. या विकारांमागच्या अनेक कारणांचा मिलाफ त्या गोष्टीत दिसून येतो. आपण सर्व जाणताच, की प्रत्येकाला नैसर्गिक गरजा असतात. बरोबर? हो, अगदी खरं. अन्न, पाणी. निवारा, स्वच्छ हवा. या गोष्टी काढून घेतल्या, तर आपले हाल होतील. त्याचबरोबर प्रत्येक माणसाला नैसर्गिकपणे मानसिक गरजा असतात. समाजाशी जोडलेलं असणं, ही गरज असते. आयुष्याला अर्थ आणि हेतू असणं, ही गरज असते. लोक आपल्याला ओळखतात, मानतात ही भावना गरजेची असते. आपलं भविष्य उज्वल आहे असं वाटणं, ही गरज असते. आजच्या आपल्या संस्कृतीत अनेक चांगल्या गोष्टी आहेत. अनेक गोष्टी भूतकाळापेक्षा चांगल्या आहेत. या काळात जन्म होणं सुखाचं. पण मूलभूत गंभीर मानसिक गरजा भागवण्याची आपली क्षमता मात्र कमी कमी होत चालली आहे. मानसिक विकारांचं प्रमाण वाढण्यामागचं हे एकमेव नसलं, तरी सर्वात महत्त्वाचं कारण आहे. हे समजून घेणं मला फार कठीण गेलं. मला माझ्या विचारांशी द्वंद्व करावं लागलं, नैराश्य मेंदूत असतं हा विचार बदलून, आपल्या जीवनशैलीसारखी अनेक कारणं त्यामागे असतात हे समजण्यासाठी. हे मला नीटपणे कधी समजलं? दक्षिण आफ्रिकेतल्या डॉ. डेरेक समरफील्ड नावाच्या मनोविकारतज्ज्ञांची मुलाखत घ्यायला गेलो, त्यावेळी. ही एक थोर व्यक्ती आहे. २००१ साली डॉ. समरफील्ड कंबोडियात होते. त्या वर्षी कंबोडियात प्रथमच रासायनिक नैराश्यरोधक औषधं उपलब्ध झाली होती. तिथल्या डॉक्टरांना ती ठाऊक नव्हती. त्यांनी विचारलं, "ही कसली औषधं?" मग डॉ. समरफील्डनी त्याविषयी माहिती दिली. यावर ते डॉक्टर्स म्हणाले, "यांची आम्हांला गरज नाही. आमच्याकडे नैराश्यरोधक आहेत." डॉ. समरफील्डनी विचारलं, "म्हणजे?" त्यांना वाटलं, आता हे निसर्गोपचाराविषयी सांगतील. सेंट जॉन्स वॉर्ट, जिंगको बिलोबा वगैरे. पण त्याऐवजी त्यांनी एक गोष्ट सांगितली. त्यांच्या गावात एक शेतकरी होता. तो भातशेती करत असे. एके दिवशी त्याचा पाय पडला, तो नेमका युद्धकाळात मातीत पेरलेल्या स्फोटकावर. स्फोटामुळे त्याने पाय गमावला. कृत्रिम पाय बसवल्यानंतर काही काळाने तो पुन्हा भाताच्या शेतात काम करू लागला. पण कृत्रिम पाय सतत पाण्याखाली ठेवून काम करणं फार वेदनादायक असतं. मला वाटतं, जिथे स्फोट झाला, तिथेच पुन्हा जाऊन काम करणंही त्याला कठीण गेलं असावं. त्याला दिवसभर रडणं अनावर होऊ लागलं. बिछान्यातून उठावंसं वाटेना. नैराश्याची सर्व लक्षणं दिसू लागली. कंबोडियन डॉक्टर म्हणाले, "मग आम्ही त्याला नैराश्यरोधक दिलं." डॉ. समरफील्डनी विचारलं, "कोणतं?" ते डॉक्टर्स त्याला भेटायला गेले होते. त्याच्याजवळ बसून त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं. त्यांना त्याच्या वेदनेमागचा अर्थ समजला. नैराश्याच्या गर्तेत त्याला स्वतःला ते समजणं कठीण होतं, पण त्यामागची कारणं त्याच्या आयुष्यात फार महत्त्वाची होती. गावातल्या इतर लोकांशी बोलताना त्यापैकी एका डॉक्टरांना सुचलं, "आपण याला एक गाय दिली, तर तो दुधाचा व्यवसाय करू शकेल. मग त्याला भाताच्या शेतात जाऊन ते त्रासदायक काम करावं लागणार नाही." त्याला गाय देण्यात आली. दोन आठवड्यांत त्याचं रडणं थांबलं. महिन्याभरात तो नैराश्यातून बाहेर आला. डॉ. समरफील्ड, ही गाय म्हणजे नैराश्यरोधक, हो ना? (हशा) (टाळ्या) लहानपणापासून नैराश्याबद्दल माझी जी समजूत आहे, तीच तुमचीही असेल, तर तुम्हांला हा एक बाष्कळ विनोद वाटेल. "नैराश्यरोधक घ्यावं म्हणून गेलो, आणि डॉक्टरांनी गाय दिली." विज्ञानाशी संबंध नसलेल्या या प्रसंगावरून कंबोडियन डॉक्टरांनी ही अटकळ बांधली. गेली कित्येक वर्षं जागतिक आरोग्य संस्था (WHO) नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तेही उत्कृष्ठ शास्त्रीय पुरावे देऊन. नैराश्य येणं, किंवा अति चिंता वाटणं म्हणजे दुबळेपणा किंवा वेड लागणं नव्हे. किंवा यंत्रासारखे तुमचे काही भाग बिघडलेत, असंही नव्हे. एक माणूस म्हणून तुमच्या काही गरजा अपूर्ण आहेत, इतकंच. कंबोडियन डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संस्था काय सांगत नाहीत, तेही पाहणं इथे महत्त्वाचं आहे. ते असं नाही म्हणाले, "मित्रा, अरे जरा भानावर ये. तुझा प्रश्न तूच समजून घे, आणि तूच सोडव." उलट ते असं म्हणाले, की "आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. आपण सर्वजण मिळून हा प्रश्न समजून घेऊ आणि सोडवू." प्रत्येक नैराश्यग्रस्त व्यक्तीची ही गरज असते, ती पूर्ण व्हायला हवी. म्हणूनच, २०१७ साली जागतिक आरोग्य दिनाच्या निवेदनात संयुक्त राष्ट्रसंघाचे एक प्रमुख डॉक्टर म्हणाले, "आपण रासायनिक असंतुलनाविषयी बोलणं कमी करून, त्याऐवजी जीवनशैलीतल्या असंतुलनाविषयी बोलायला हवं." औषधांमुळे काही लोकांना खरोखरच बरं वाटतं. मलाही काही काळ बरं वाटलं होतं. पण जीवशास्त्रापेक्षा खोल जाणाऱ्या या समस्येवरचा उपायही तितकाच खोलवर जाणारा हवा. हे जेव्हा मी प्रथम ऐकलं, त्यावेळी मला वाटलं होतं, "मी शास्त्रीय पुरावे पाहिले आहेत. पुष्कळ संशोधनं वाचली आहेत. या विषयातल्या तज्ज्ञांशी बोललो आहे." आणि तरीही मला समजत नव्हतं, "हे करायचं कसं?" आपल्या नैराश्याची कारणं बरेचदा त्या कंबोडियन शेतकऱ्याच्या गोष्टीपेक्षा जास्त गुंतागुंतीची असतात. ती समजून घेण्याची सुरुवात तरी कुठून करावी? पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून मी जगभर फिरलो, तेव्हा हे समजून घेणारे लोक मला भेटत गेले. सिडनी पासून सॅन फ्रान्सिस्को आणि साओ पावलो पर्यंत. हे लोक नैराश्य आणि चिंताविकाराची सखोल कारणं समजून घेत होते आणि आपल्या समूहाद्वारे त्यावर उपाय करत होते. मला भेटलेल्या सर्वच लोकांबद्दल मी इथे सांगू शकत नाही. किंवा त्या नऊ कारणांबद्दलही इथे बोलू शकत नाही. कारण १० तासांचं TED व्याख्यान द्यायची परवानगी नाही. वाटल्यास आयोजकांजवळ तक्रार करा! म्हणून मी त्यापैकी दोन कारणं आणि दोन उपाय सांगणार आहे. पहिलं: मानवी इतिहासात जास्त एकटेपणा आपल्याच पिढीला जाणवला आहे. नुकतंच एका पाहणीत अमेरिकन लोकांना विचारलं गेलं, "आपली कोणाशीच जवळीक उरलेली नाही, असं तुम्हांला वाटतं का?" यावर ३९ टक्के लोकांनी हे वर्णन आपल्याला लागू पडतं असं सांगितलं. "कोणाशीच जवळीक नाही." आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटेपणा मोजला असता, ब्रिटन आणि युरोप अमेरिकेच्या खालोखाल आहेत. इथे कोणाला उगाच अभिमान वाटायला नको! (हशा) या विषयातल्या एका तज्ज्ञांशी मी बराच काळ चर्चा केली. त्या थोर माणसाचं नाव, प्राध्यापक जॉन कासिओपो. ते शिकागोत राहत असत. त्यांच्या संशोधनाबद्दल मी पुष्कळ चिंतन केलं. प्राध्यापक कासिओपो विचारतात, "आपण अस्तित्वात आहोत, ते कशामुळे? आपण जिवंत का राहिलो आहोत?" यामागचं मुख्य कारण असं, की आफ्रिकेच्या सव्हाना प्रदेशातले आपले पूर्वज एका गोष्टीत खूप हुशार होते. भोवतालच्या वन्य श्वापदांपेक्षा ते आकाराने मोठे नव्हते, किंवा त्यांच्यापेक्षा जलद धावूही शकत नव्हते. पण ते जमाव करून एकत्र राहत होते, एकमेकांना साह्य करत होते. ही आपल्या मानवजातीची दैवी शक्ती आहे. आपण समूहात राहतो. मधमाशांची उत्क्रांती होऊन त्या पोळ्यात राहू लागल्या, तसा मनुष्यप्राणी जमातीत राहू लागला. या जमातींची मोडतोड करणारी आपलीच पहिली पिढी आहे. यामुळे आपलं जीवन उध्वस्त होत आहे. वास्तविक हे असं व्हायला नको. माझ्या पुस्तकातली आणि माझ्या आयुष्यातलीही एक मोठी व्यक्ती आहे, सॅम एव्हरिंग्टन. लंडनच्या पूर्वेच्या एका गरीब वस्तीतले हे डॉक्टर. तिथे मी बराच काळ राहत होतो. सॅम फार अस्वस्थ होते. कारण त्यांचे अनेक रुग्ण भयंकर नैराश्य आणि चिंताविकाराने ग्रस्त होते. माझ्यासारखंच डॉ. सॅमना देखील वाटतं, की नैराश्यरोधकांमुळे काही लोकांना थोडं बरं वाटू शकतं. त्यांनी दोन गोष्टी पाहिल्या. एक, त्यांचे रुग्ण बराच काळ त्रस्त होते. यामागची कारणं स्पष्ट होती. उदाहरणार्थ, एकटेपणा. दोन, औषधांनी काही लोकांना थोड्या प्रमाणात बरं वाटत असलं, तरी अनेक वेळा औषधामुळे मूळ प्रश्न सुटत नव्हता. एके दिवशी, डॉ. सॅमनी एक नवीन उपाय वापरायचं ठरवलं. त्यांच्या दवाखान्यात एक महिला आली. तिचं नाव लिसा कनिंगहॅम. माझी तिच्याशी नंतर ओळख झाली. भयानक नैराश्य आणि चिंताविकारामुळे लिसा घरातून बाहेरच पडत नव्हती. तब्बल सात वर्षं. डॉ. सॅमनी तिला सांगितलं, "आम्ही तुला औषधं तर देऊच, पण त्याबरोबर तू आणखी काहीतरी करायचं आहेस. आठवड्यातून दोनदा इथे यायचं, आणि इतर रुग्णांशी बोलायचं. पण आपण किती दुर्दैवी, अशा प्रकारचं काही बोलायचं नाही. तर सगळ्यांनी मिळून काहीतरी अर्थपूर्ण काम शोधून ते करायचं. मग एकटेपणा वाटणार नाही, आयुष्याला अर्थ नाही असं वाटणार नाही." त्या रुग्णांना लिसा जेव्हा प्रथम भेटली, तेव्हा तो ताण असह्य होऊन तिला वांत्या होऊ लागल्या. तेव्हा इतरांनी तिला सावरलं. चर्चा सुरु झाली. "आपण एकत्र येऊन काय करू शकतो?" हे रुग्ण माझ्यासारखे, लंडनच्या आतल्या भागातले. त्यांना बागकामाची काहीच माहिती नव्हती. "आपण बागकाम शिकूया का?" दवाखान्याच्या मागेच पडीक जागा होती. "इथे बाग करूया का?" त्यांनी लायब्ररीतून पुस्तकं आणली. You Tube वर धडे घेतले. मातीत हात मळवून घेतले. ऋतुचक्र समजून घ्यायला सुरुवात केली. अनेक पुराव्यांनुसार, निसर्गाशी जवळीक करणं हा नैराश्यावर एक चांगला उपाय आहे. पण हा गट त्याहीपेक्षा जास्त काही करत होता. त्यांनी एक जमात तयार केली. एक समूह तयार केला. त्यांना एकमेकांविषयी आपुलकी वाटू लागली. एखादा गैरहजर असला, "काय झालं? ठीक आहेस ना?" अशी चौकशी करू लागले. त्याला कसला त्रास होत असेल ते जाणून घेऊ लागले. लिसा म्हणाली, "जसजशी बाग बहरू लागली, तसतसे आम्हीही बहरू लागलो!" याला म्हणतात समाजोपचार. हे युरोपमध्ये वाढत आहे. हळूहळू गोळा होणाऱ्या पुराव्यांनुसार नैराश्य आणि चिंताविकारात खरोखरीच घट होत असल्याचं दिसून येत आहे. एके दिवशी या बागेत असताना माझ्या मनात एक विचार आला. त्या सुंदर बागेत गेलो असताना मला जे वाटलं, त्यामागे ऑस्ट्रेलियन प्राध्यापक ह्यू मके यांच्या विचारांची प्रेरणा आहे. मला वाटलं, की आजच्या आपल्या संस्कृतीत एखाद्याला उदास वाटत असेल, तर आपण त्याला काय सांगतो? तुम्ही सांगत असाल, मीही सांगितलं आहे.. "तू स्वतः कोण आहेस ते जाणून घे. स्वतःला पटेल तेच कर." आणि माझ्या लक्षात आलं, की त्याऐवजी आपण सांगायला हवं, "स्वतःपुरतं पाहू नकोस. तुझा एकट्याचा नव्हे, समूहाचा विचार कर. समूहाचा भाग हो." (टाळ्या) या विकारांवर उपाय म्हणून आपण एकांडेपणाने राहून आपल्या एकट्याच्या हातात असलेली साधनं जास्तीत जास्त वापरत गेलो. हे विकार बळावण्यात हा समज थोडा कारणीभूत ठरला असावा. स्वतःला महत्त्व देण्यापेक्षा एखादा मोठा उद्देश हवा. इथे नैराश्य आणि चिंताविकाराचं आणखी एक कारण सापडतं, ज्याविषयी मला आज बोलायचं होतं. आपण सर्वजण जाणतो, की आहारात चटपटीत पदार्थ वाढल्यामुळे आपलं आरोग्य बिघडत चाललं आहे. मी पौष्टिक आहार घेतो, असं नव्हे. व्याख्यानापूर्वी मी मॅकडोनाल्ड मध्ये खाऊन आलो. तुम्हां सर्वांना TED ची पौष्टिक न्याहारी खाताना पाहून मला लाज वाटली. पोषणरहित अन्नामुळे जसं आपलं आरोग्य बिघडतं, तसाच, काही निकृष्ट मूल्यांनी मनाचा ताबा घेतल्यामुळे आपलं मानसिक आरोग्य बिघडतं. हजारो वर्षांपासून तत्त्ववेत्ते सांगताहेत, की पैसा, समाजातलं स्थान, दिखाऊपणा यांना महत्त्व दिलं, तर मानसिक आरोग्य ढासळेल. असं शोपेनहावर म्हणाले होते. नेमकं हेच नव्हे,पण अशाच अर्थाचं. आश्चर्य म्हणजे, यावर फारसं शास्त्रीय संशोधन झालं नव्हतं. पण मला भेटलेली एक असामान्य व्यक्ती, प्राध्यापक टिम कासर हे इलिनॉयच्या नॉक्स कॉलेजमध्ये गेली तीस वर्षं या विषयावर संशोधन करताहेत. त्यांच्या संशोधनाने काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या आहेत. पहिली गोष्ट. उत्तमोत्तम वस्तू विकत घेऊन त्यांचं प्रदर्शन केल्याने दुःखावर मात होऊन आनंद मिळेल असं जितकं समजाल, तितकं नैराश्य आणि चिंता पदरी पडतील. दुसरी गोष्ट. अशा समजांनी आपल्या संपूर्ण समाजाचाच ताबा घेतला आहे. मी आयुष्यभर पाहतो आहे, जाहिरातबाजी, इंस्टाग्राम इत्यादि गोष्टी कशा प्रभाव पाडतात. मला वाटतं आपण जन्मापासून मानसिक KFC खातो आहोत. चुकीच्या ठिकाणी आनंद शोधतो आहोत. आणि जसं चटपटीत अन्न पोषणाची गरज भागवण्याऐवजी उलट आपल्याला आजारी पाडतं, तसंच निकृष्ट मूल्यं आपल्या मानसिक गरजा न भागवता आपल्याला निरोगी आयुष्यापासून दूर नेतात. मी जेव्हा प्रथम प्रा. कासर यांना भेटून हे जाणून घेत होतो, तेव्हा माझ्या मनात संमिश्र भावना उभ्या राहिल्या. माझ्यासाठी हे एक आव्हान होतं. कारण माझ्या स्वतःच्याच आयुष्यात मी बरेचदा उदासीनतेचा सामना करण्यासाठी एखादी बाह्य परिणाम करणारी भपकेबाज गोष्ट करत आलो होतो. आणि त्याचा काही उपयोग होत नव्हता, हेही पाहत आलो होतो. मला वाटलं, हे तर साहजिकच आहे. अगदी रटाळ मुद्दा, हो ना? आता मी तुम्हांला सांगतो, मरणशय्येवर असताना, आपल्याजवळ किती बूट आहेत, किंवा किती री-ट्विट मिळाले होते या गोष्टी तुम्हांला आठवणार नाहीत. त्यावेळी आठवतील ते प्रेमाचे, अर्थपूर्ण जगण्याचे आणि सुसंवादाचे क्षण. हे वाक्य वापरून गुळगुळीत झालेलं आहे खरं. मी प्रा. कासरना विचारलं, "मला यात एक विचित्र दुटप्पीपणा दिसतो. का बरं?" ते म्हणाले, "कारण आपल्याला मनात कुठेतरी या गोष्टी ठाऊक असतात. पण या संस्कृतीत आपण त्या पाळत नाही." या गोष्टी रटाळ वाटण्याइतपत ठाऊक आहेत. पण आपण त्या पाळत नाही. मी विचारलं, "का? इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक असून आपण त्या पाळत का नाही?" थोड्या वेळाने प्रा. कासर म्हणाले, "कारण आपण एका यंत्रात राहतो. आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचा आपल्याला विसर पाडणं हे त्याचं कार्य." यावर मला खूप विचार करावा लागला. "कारण आपण ज्या यंत्रात राहतो, ते आपल्याला महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावतं." हे यंत्र मोडून टाकता येईल का, हे प्रा. कासरना शोधून काढायचं होतं. यावर त्यांनी पुष्कळ संशोधन केलं आहे. इथे मी एक उदाहरण सांगतो. तुम्हां सर्वांना विनंती: आपल्या कुटुंब आणि मित्रांबरोबर करून पहा. नेथन डंगन याने तरुण आणि प्रौढांचा एक गट बोलावला. काही दिवस त्यांच्या सभा घेतल्या. यातला एक भाग असा होता: आपल्या आयुष्यातला असा एखादा क्षण आठवा, ज्यावेळी तुम्हांला खरोखर आयुष्याचा अर्थ आणि हेतु गवसला असेल. प्रत्येकाला हे निरनिराळं जाणवलं. कोणाला आठवलं संगीत, कोणाला लेखन, मदतकार्य. तुम्हां सर्वांनाही नक्कीच काहीतरी जाणवलं असेल. यातला दुसरा भाग असा होता: प्रश्न विचारायला प्रवृत्त करणे. "या महत्त्वाच्या गोष्टींना जास्त वेळ कसा द्यावा? आणि निरुपयोगी कचरा विकत घेऊन त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून लोकांना OMG म्हणायला लावणं कसं टाळावं?" नुसता या सभांना येण्याचादेखील चांगला परिणाम दिसून आला. हे चंगळवादाच्या व्यसनमुक्तीचे वर्ग, बरोबर? अशा सभांना हजर राहून एकमेकांचे विचार ऐकणं, ते पाळण्याचा निश्चय करणं, एकमेकांची चौकशी करणं यामुळे या लोकांच्या विचारसरणीत मोठा बदल घडून आला. चुकीच्या गोष्टींत आनंद शोधायला लावून नैराश्यात ढकलणाऱ्या संदेशांची वावटळ टाळून ते नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या अर्थपूर्ण आणि पोषक विचारांकडे वळू लागले. पण मी असे काही उपाय शोधले, त्याबद्दल लिहिलं, यात आज न सांगितलेलेही काही आहेत, तरीसुद्धा माझ्या मनात येतं, हे विचार सुचायला मला इतका वेळ का लागला? कारण इतरांना समजावून सांगताना-- त्यापैकी काही कठीण आहेत, सर्व नव्हेत. ते सोपे वाटतात. ते काही अवकाश विज्ञान नव्हे. या गोष्टी आपल्याला मनात कुठेतरी ठाऊक असतात. मग त्या समजायला इतक्या कठीण का? मला वाटतं, यामागे पुष्कळ कारणं आहेत. यापैकी एक कारण असं, की नैराश्य किंवा चिंताविकार म्हणजे नक्की काय, याविषयीच्या आपल्या कल्पना बदलायला हव्यात. काही खरीखुरी जैविक कारणंसुद्धा या विकारांमागे असू शकतात. आपण सगळं ठपका जैविक कारणांवरच ठेवतो. असं मी बराच काळ करत होतो. आपल्या संस्कृतीचा प्रभाव मी आयुष्यभर पाहत आलो आहे. या प्रभावामुळे आपण निराश किंवा चिंताग्रस्त व्यक्तीला सांगतो, "तुला होणाऱ्या वेदनांना काही अर्थ नाही. फक्त थोडासा बिघाड झाला आहे. संगणक प्रणालीत येतो तसा काही व्यत्यय आला आहे. तुझ्या डोक्यातली जुळणी थोडी बिघडली आहे." पण नैराश्य म्हणजे बिघाड नव्हे हे समजलं, तेव्हा माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. तुमचं नैराश्य म्हणजे तुम्हांला मिळालेला एक इशारा. तो तुम्हांला काहीतरी सांगत असतो. (टाळ्या) निराश वाटण्यामागे काही कारणं असतात. नैराश्याच्या गर्तेत ती समजणं कठीण असतं. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून जाणतो. पण योग्य मदत मिळाली, तर समस्या समजून घेऊन, सर्वांनी मिळून त्या सोडवता येतात. पण हे करण्याअगोदरची पहिली पायरी म्हणजे हे इशारे धुडकावून न लावणं. त्यांना दुबळेपणा, वेड किंवा जैविक कारण न समजणं. काही थोड्या अपवादांमध्ये तसं असू शकतं. हे इशारे आपण ऐकायला हवेत. कारण आपण ऐकायलाच हवं असं काहीतरी ते सांगत असतात. आपण जेव्हा खरोखरीच हे इशारे ऐकून त्यांचा योग्य तो मान राखायला लागू, तेव्हाच आपल्याला दिसू लागतील मुक्तता देणारे, सक्षम करणारे सखोल उपाय. भोवताली सर्वत्र गायी थबकल्या आहेत! धन्यवाद. (टाळ्या)